आउटडोअर जाहिरात क्षेत्रातील ब्राइट आउटडोअर मीडिया लिमिटेड कंपनीने मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) मुख्य फलकावर नुकतेच पदार्पण केले आहे. कंपनीच्या विकास प्रवासातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यापूर्वी २४ मार्च २०२३ रोजी कंपनी बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध झाली होती. या माध्यमातून शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी ती देशातील पहिली आउटडोअर मीडिया कंपनी ठरली होती.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील कामगिरी
ब्राइट आउटडोअर मीडिया लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १५५.४३ कोटी रुपयांचा महसूल नोंदविला. या काळात कंपनीचा ईबीआयटीडीए ३५.२३ कोटी रुपये, तर निव्वळ नफा २४.०५ कोटी रुपये होता. कंपनीचे प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) १२.२६ रुपये होते. आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात कंपनीने ९२.१२ कोटी रुपयांचा महसूल, २०.२५ कोटी रुपयांचा ईबीआयटीडीए आणि १३.९७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला. या कालावधीत ईपीएस १२.९८ रुपये होता.
विस्ताराची दिशा
कंपनीने गेल्या काही वर्षांत जाहिरात क्षेत्रातील आपले जाळे विस्तारले आहे. सरकारी प्रकल्प, पायाभूत सुविधा, रेल्वे आणि डिजिटल जाहिरात क्षेत्रातील संधींचा लाभ घेतला आहे. सध्या कंपनीकडे विविध ठिकाणी १,३५० हून अधिक होर्डिंग्ज आणि ५० हून अधिक मोठ्या आकाराचे डिजिटल एलईडी बिल बोर्ड आहेत. पारंपरिक जाहिरातींसोबतच डिजिटल जाहिरात क्षेत्रातही कंपनी विस्तार करीत आहे. पारंपरिक आउटडोअर जाहिरातींच्या पलीकडे जाऊन एकात्मिक ब्रँडिंग आणि जाहिरात सेवा देण्यासाठी कंपनीने ‘ब्राइट ३६०’ हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत विविध जाहिरात माध्यमे आणि ब्रँड प्रसिद्धीसाठी आवश्यक सेवा एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. याशिवाय सौरऊर्जेवर चालणारी जाहिरात यंत्रणा विकसित करण्याचीही कंपनीची योजना आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश लखानी यांनी सांगितले की, बीएसई आणि एनएसईच्या मुख्य फलकावर सूचीबद्ध होणे हा कंपनीच्या प्रवासातील अभिमानाचा क्षण आहे. २०२३ मध्ये देशातील पहिली सूचीबद्ध आउटडोअर मीडिया कंपनी होण्यापासून ते आता मुख्य फलकावर दाखल होण्यापर्यंतचा प्रवास महत्त्वाचा आहे. डिजिटल जाहिराती, पायाभूत सुविधा आणि एकात्मिक जाहिरात सेवांच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार करण्यावर आगामी काळात भर राहील.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply