फलटण तालुक्यातील राजुरी या छोट्याशा गावातून सुरू झालेला एक प्रवास आज साताऱ्यातील नवउद्योजकतेचे आश्वासक उदाहरण म्हणून ओळखला जात आहे. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रोहित गणपत भोसले यांनी कष्ट, जिद्द आणि मित्रांच्या साथीच्या जोरावर हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
घरची परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी मुलांच्या शिक्षणात कधीही अंतर पडू दिले नाही. पुढील शिक्षणासाठी रोहित २०१० मध्ये साताऱ्यात आला. महाराजा सयाजीराव विद्यालय, शाहू बोर्डिंग आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये त्याने शिक्षण घेतले. या संस्थांनी त्याला केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही, तर स्वावलंबनाचे संस्कारही दिले.
## शिक्षणासोबत कष्टाची शिकवण
महाविद्यालयीन काळात रोहितने कर्मवीरांच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेत सहभाग घेतला. पहाटे गिरणीत जाऊन दळण दळणे, सुटीच्या दिवशी बागेत खुरपणी करणे आणि दररोज चार तास श्रम करणे, हे त्याचे नित्याचे काम होते. कोणताही संकोच न बाळगता त्याने दोन वर्षे हे कष्ट केले. या काळात त्याला केवळ दोन वेळचा डबा मिळाला नाही, तर आयुष्याचा भक्कम पाया मिळाला. डॉ. रामराजे माने-देशमुख, डॉ. शरद ठोकळे आणि राहुल व्हराडे यांसारख्या शिक्षकांचे मार्गदर्शन त्याच्या आत्मविश्वासाला बळ देणारे ठरले.
शिक्षणानंतर पोटापाण्यासाठी रोहितने साताऱ्यातील सुंदरबन हॉटेलमध्ये काम सुरू केले. टेबल पुसण्यापासून वेटर, कॅप्टन आणि थेट मॅनेजर पदापर्यंत त्याने मजल मारली. या प्रवासात आलेल्या कटू अनुभवांतून आणि अपमानातून त्याने एकच ध्यास घेतला — स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आणि तिथे आपल्यासारख्या कष्टकरी मुलांना सन्मानाने काम द्यायचे.
## मित्रांसोबत उभी राहिलेली टीम
या धडपडीत भरत कदम यांच्यासारखे मार्गदर्शक भागीदार त्याला भेटले. त्यांनी रोहितला व्यवसायातील खाचाखोचा शिकवल्या आणि चुका सांभाळून घेत आधार दिला. ‘कमवा आणि शिका’मध्ये सोबत घाम गाळणाऱ्या परशुराम कांबळे, ऋषी तांबे, बाजी काळे आणि दत्ता तोडकर या सहकारी मित्रांना रोहितने सोबत घेतले. या सर्वांतून ‘स्वावलंबी मॅनेजमेंट टीम’ उभी राहिली.
आज सातारा, पाचवड, भुईंज आणि कास पठार अशा विविध ठिकाणी हॉटेल्सचे व्यवस्थापन ही तरुण मंडळी सांभाळत आहेत. सुरुवातीला सुंदरबन हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळताना मिळालेला अनुभव पुढे पाच हॉटेलचे व्यवस्थापन सांभाळण्यापर्यंत उपयोगी आला. गोदावरी, सोनचाफा, गुलमोहर, झा झेन, इंगळे पेढा हाऊस या हॉटेल व्यवसायासोबतच आसमानी ट्रेकर्स, गड-किल्ले संवर्धन आणि ट्रॅव्हल्स अशा अनेक क्षेत्रांत ही टीम कार्यरत आहे.
आज त्यांच्या या प्रयत्नांमुळे १३० ते १४० कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरळीत चालतो आहे. वयाच्या अवघ्या पंचविशीत उभा राहिलेला हा डोलारा दाखवून देतो, की स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास असेल आणि सोबत प्रामाणिक मित्रांची साथ असेल, तर संघर्षाच्या वाटेवरही यशाची फुले फुलवता येतात. स्वतः मोठे होण्यापेक्षा आपल्या माणसांना सोबत घेऊन मोठे होण्यातच खऱ्या यशाचा आनंद सामावलेला असतो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply