बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. तिने एक पोस्ट शेअर करत तिने निर्मिती केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या व्हेंटिलेटर या चित्रपटाचा सिक्वेल व्हेंटिलेटर २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, पर्पल पेबल पिक्चर्स आणि मॅगीज पिक्चर्स यांनी नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे.
दहा वर्षांनंतर कामेरकर कुटुंबाची गोष्ट पुढे
दहा वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या कामेरकर कुटुंबाने प्रेक्षकांना हसवले, भावूक केले आणि नात्यांचे अनेक रंग दाखवले. रुग्णालयाच्या परिसरात घडणाऱ्या या कथेतील प्रत्येक व्यक्तिरेखा, त्यांचे स्वभाव, आपापसातील गंमतीशीर संवाद आणि भावनिक प्रसंग प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले. आता याच कामेरकर कुटुंबाची गोष्ट पुढे नेण्यासाठी दिग्दर्शक राजेश मापुस्कर सज्ज झाले आहेत. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा या कुटुंबाला एकत्र आणताना पहिल्या भागाशी जोडलेल्या आठवणी आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा या दोन्हींचा विचार केला आहे. यावेळीही प्रेक्षकांना हसवणारा, विचार करायला लावणारा आणि मनाला भिडणारा अनुभव देण्याचा प्रयत्न असेल, असे निर्मात्यांनी सांगितले.
निर्मात्यांची भूमिका आणि चित्रीकरण
दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी सांगितले की, व्हेंटिलेटर चित्रपटासोबत त्यांच्या अनेक आठवणी आणि भावना जोडल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेले प्रेम आजही मनात ताजे आहे. दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच विश्वात परतताना वेगळाच आनंद आणि जबाबदारीची जाणीव होत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रियंका चोप्रा जोनस आणि डॉ. मधु चोप्रा यांनी सांगितले की, पहिल्या चित्रपटाला मिळालेले प्रेम त्यांच्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले, त्यामुळे या कथेचा पुढचा भाग घेऊन येणे हा त्यांच्यासाठी आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय आहे. पर्पल पेबल पिक्चर्स आणि मॅगीज पिक्चर्स यांची निर्मिती असलेल्या व्हेंटिलेटर २ चे लेखन आणि दिग्दर्शन राजेश मापुस्कर यांनी केले आहे. प्रियंका चोप्रा जोनस, डॉ. मधु चोप्रा आणि राजेश मापुस्कर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून या नव्या पर्वाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. दहा वर्षांनंतर कामेरकर कुटुंबात नेमके काय घडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply