लडाखमध्ये फिरायला गेल्यावर तिथले उंच डोंगर, वळणावळणाचे रस्ते आणि निसर्गाचे सौंदर्य पाहून कोणाचेही मन हरखून जाईल. पण याच सुंदर परिसरात एक असे ठिकाण आहे, जे पाहून आनंद होत नाही, तर प्रचंड राग येतो. ही घाण निसर्गाने केलेली नाही, तर माणसानेच पसरवली आहे. तिथे केवळ प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच दिसतो.
हे ठिकाण आहे लडाखमधील घाटा लूप्स. मनाली-लेह मार्गावरील हा डोंगरातील वळणावळणाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या १९ व्या वळणावर एक छोटेसे मंदिर आहे. त्याला घोस्ट टेम्पल किंवा भूताचे मंदिर म्हणतात. या मंदिरात पाण्याच्या बाटल्या अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र श्रद्धेपोटी आणलेल्या बाटल्यांमुळे प्लास्टिक कचरा वाढत असल्याचा मुद्दा आता चर्चेत आला आहे.
१९९९ मधील अपघाताची कहाणी
स्थानिकांमध्ये प्रचलित असलेल्या कथेनुसार, १९९९ मध्ये या ठिकाणी एका ट्रकचा अपघात झाला होता. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाचा पाणी न मिळाल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी ट्रकचालक आणि प्रवासी मंदिरात पाण्याच्या बाटल्या अर्पण करू लागले. कालांतराने ही प्रथा वाढत गेली आणि बाटल्यांचा खच साचत गेला.
एका प्रवासव्लॉगरने आपल्या लडाख प्रवासादरम्यान या मंदिराचा व्हिडिओ शेअर केला. मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच दिसत आहे. तिथे लाखांहून अधिक बाटल्या असू शकतात, असा अंदाज त्याने बांधला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.
श्रद्धा जपा, प्लास्टिक नको
या मंदिरामागची कहाणी भावनिक असली, तरी श्रद्धा व्यक्त करताना प्लास्टिक कचरा मागे ठेवणे योग्य नाही. पाणी अर्पण करण्याची प्रथा सुरू ठेवायची असेल, तर रिकामी बाटली परत नेणे हा त्यावरचा सोपा मार्ग आहे. कारण ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ पाणी अर्पण केले जाते, त्याला पाण्याची गरज होती, प्लास्टिकच्या बाटल्यांची नाही. हा संदेश त्या व्हिडिओतून देण्यात आला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply