पिंप्री अंचला-अहिवंतवाडी मार्गावरील कोल्हेर शिवारात शुक्रवारी सकाळी रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खोल खड्ड्यात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात पंकज प्रकाश ठाकरे (वय १७, रा. अहिवंतवाडी) याचा मृत्यू झाला, तर ओंकार अशोक भुसार (१८) गंभीर जखमी झाला. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
बाजारपेठेत जाताना अपघात
अहिवंतवाडी येथील पंकज ठाकरे आणि ओंकार भुसार शुक्रवारी पहाटे नीलेश संजय ठाकरे (१८) याच्यासमवेत ट्रॅक्टर-ट्रॉलीत टोमॅटोचे क्रेट भरून खोरीफाटा येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जात होते. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास त्यांचा ट्रॅक्टर कोल्हेर शिवारात आला. येथे दोनपदरी रस्त्याचे काम सुरू असून, रस्त्याच्या कडेला साइडपट्टीचे काम अपूर्ण आहे आणि खोलगट भाग व खड्डे कायम आहेत. पहाटे अंधूक प्रकाशात ट्रॅक्टरचे चाक रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला. या अपघातात पंकज ठाकरे ट्रॅक्टरखाली पूर्णपणे दबला गेला, तर ओंकार भुसार गंभीर जखमी झाला.
रस्त्याच्या सुरक्षेचा प्रश्न
अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना बाहेर काढले आणि वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पंकजचा मृत्यू झाला. ओंकारची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नाशिकला हलविण्यात आले. रस्त्याच्या कडेला साइडपट्टीचे काम अपूर्ण राहिल्याने आणि खोल खड्डे कायम असल्याने अपूर्ण रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply