दिवाळीदरम्यान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा चालत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू असताना, सध्या अनेक कंपन्यांचे शेअर्स आकर्षक दरांमध्ये उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर मुहूर्त ट्रेडिंगमध्ये खरेदीबाबत उत्सुकता बघायला मिळत आहे. थेट भांडवल बाजारात तसेच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी ग्राहकांचा ओढा वाढला आहे.
वाढती महागाई आणि उत्पन्नाचे मर्यादित स्रोत यांमुळे आता चांगला परतावा मिळवून देणाऱ्या पर्यायांची निवड केली जात आहे. पारंपरिक गुंतवणूक पर्याय अधिक सुरक्षित मानले जात असले तरी त्यातून मिळणारा परतावा कमी असल्याने गुंतवणूकदार नवनवीन पर्यायांची चाचपणी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेअर बाजारात थेट गुंतवणूक तसेच म्युच्युअल फंडच्या माध्यमातील गुंतवणुकीकडे सर्वाधिक कल आहे.
बाजाराला आधार मिळाला
आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्थिर वातावरण असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू होती. परंतु आता शेअर बाजाराला आधार मिळाला असून घसरण थांबली आहे. सध्याच्या स्थितीत अनेक कंपन्यांचे शेअर्स रास्त दरांमध्ये उपलब्ध झाले असून त्यांची जोरदार खरेदी होत आहे.
क्षेत्रनिहाय पर्यायांना पसंती
शेअर असो किंवा म्युच्युअल फंड, यांमध्ये ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल आणि पायाभूत सुविधा असे क्षेत्रनिहाय गुंतवणूक संधी देणाऱ्या योजना उपलब्ध केल्या जात आहेत. अनेक गुंतवणूकदार या क्षेत्रांचा अभ्यास करून आणि भविष्याचा अंदाज घेत गुंतवणुकीस प्राधान्य देत आहेत.
वाढत्या स्पर्धेत अनेक ब्रोकरेज सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांसोबत आता युपीआय सेवा पुरवठादार देखील म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देत आहेत. अगदी एक रुपयापासून गुंतवणुकीची सुविधा दिली जात आहे. त्यामुळे गुंतवणूक रक्कम वाढीसाठी प्रोत्साहन मिळत आहे आणि कोणत्याही मध्यस्थाशिवाय गुंतवणूक करणे शक्य झाले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply