नाशिकमध्ये दिवाळीच्या निमित्ताने सलग सुट्या आल्या असून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे कामकाज पुढील काही दिवस थंडावणार आहे. शनिवार, ७ नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस शासकीय-निमशासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावाकडची वाट धरली आहे. खासगी आस्थापनांनाही जोडून सुट्टी असल्याने नोकरदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सुट्यांचे वेळापत्रक असे
शनिवार (७ नोव्हेंबर) आणि रविवार (८ नोव्हेंबर) या दोन दिवस सार्वजनिक सुट्या आहेत. सोमवार (९ नोव्हेंबर) ते बुधवार (११ नोव्हेंबर) असे तीन दिवस दिवाळीची सुट्टी असेल. परिणामी शासकीय कार्यालये पुढील आठवड्यात गुरुवारी, १३ नोव्हेंबर रोजीच खुली होतील. मात्र बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १२ व १३ नोव्हेंबरला रजेचा अर्ज केला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांचे कामकाज खऱ्याअर्थाने १६ नोव्हेंबरपासून पूर्ववत होईल.
सार्वजनिक सुट्या आणि दिवाळीचा सण जोडून आल्याने खासगी आस्थापने व कार्यालयांचे कामकाजही थंडावणार आहे. जोडून सुट्या आल्याने नोकरदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. एकूण दिवाळीचा उत्साह बघता येत्या आठवड्यात शासकीय असो किंवा खासगी आस्थापनांचे कामकाज ठप्प होणार आहे.
ट्रॅव्हल्सचे बुकिंग फुल्ल
नाशिकमध्ये वास्तव्य करणारे अधिकारी व कर्मचारी तसेच खासगी आस्थापनांमधील नोकरदारांनी जोडून सुट्टी आल्याने कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासूनच अनेकांनी खासगी वाहनाने गावाकडे प्रयाण केले. तसेच बहुतांश जणांनी ट्रॅव्हल्सचे बुकिंग केले आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांमध्येही उत्साह दिसून येत आहे. वेळेवर तिकीट उपलब्ध न होणाऱ्या नागरिकांकडून खासगी वाहनांच्या बुकिंगवर भर दिला जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply