गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश होता. या नेत्यांनी पक्ष नेतृत्वासंदर्भात अमित शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पटेल यांनी पवारांची भेट घेताच पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला उधाण आले आहे.
तटकरे यांचा दावा आणि गोगावले यांची भूमिका
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कोणतीच चर्चा सुरू नाही. मात्र अजित पवार असते तर बारा फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झाले असते, असे तटकरे यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र यायचे की नाही, हा त्यांचा अंतर्गत निर्णय असल्याचे गोगावले यांनी म्हटले आहे. शरद पवार, सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेत्यांनीच एकत्रीकरणाचा निर्णय घ्यावा, अशी त्यांची भूमिका आहे.
वरिष्ठांनीच अंतिम निर्णय घ्यावा
अजित पवार असताना काय घडले, याबाबत त्यांनाच माहिती असल्याचे सांगत गोगावले यांनी त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत आपले काहीही म्हणणे नाही, वरिष्ठांनीच अंतिम निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू असली तरी प्रत्यक्षात याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुढील काळात दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटी आणि त्यानंतरच्या चर्चांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply