बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची ठरली आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील ५७ हजार ८७३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट ५८९ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मिळालेली ही मदत दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजासाठी मोठा दिलासा ठरली आहे.
चौथ्या यादीतून मोठा लाभ
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेची चौथी यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. या यादीतील शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळाला आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या १ हजार ४८७ शेतकऱ्यांचे ६ कोटी ९५ लाख रुपये माफ झाले आहेत. उर्वरित रक्कम प्रामुख्याने राष्ट्रीयकृत बँका आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे.
आतापर्यंत १,५०८ कोटींची कर्जमुक्ती
या चौथ्या टप्प्यापूर्वी पहिल्या तीन टप्प्यांमध्ये १ लाख १० हजार ८७८ शेतकऱ्यांच्या ९१८ कोटी ५६ लाख रुपयांच्या कर्जमुक्तीला मंजुरी देण्यात आली होती. चारही टप्पे एकत्र केल्यास बीड जिल्ह्यातील एकूण १ लाख ६८ हजार ७५१ शेतकऱ्यांना १,५०८ कोटी ४९ लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळाली आहे. जिल्ह्याच्या सहकार आणि कृषी क्षेत्राच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी थेट आर्थिक मदत मानली जात आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पोर्टलवर नावे जाहीर झालेल्या २ लाख ४ हजार ३६६ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांपैकी १ लाख ७५ हजार ४२९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. मात्र २८ हजार ९३७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. त्यापैकी ११ हजार ०८० शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीही उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे.
ज्या पात्र शेतकऱ्यांचे नाव यादीत आहे, परंतु कागदपत्रांची पूर्तता बाकी आहे, त्यांनी तातडीने प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्यथा या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतीश तोटावार यांनी शेतकऱ्यांना ई-सेवा केंद्र किंवा बँकांमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply