आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा आणखी फटका बसला आहे. कापणीला आलेली भातशेती अनेक ठिकाणी जमिनीवर आडवी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असून, नुकसानीचे नव्याने पंचनामे करून भरपाई देण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
श्रीवर्धन तालुक्यात भातशेती हे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. तालुक्यात सुमारे एक हजार ४०३ हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. मात्र ऐन कापणीच्या हंगामात पावसाने तडाखा दिल्याने उभे पीक आडवे झाले. वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
आधीचे पंचनामे, नवे नुकसान
तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर प्रशासनाने यापूर्वी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले होते. त्यानुसार भरपाई मिळण्याची अपेक्षा असतानाच नव्या पावसाने उरलेसुरले पीकही बाधित झाले आहे. त्यामुळे आधीच्या पंचनाम्यांत नव्या नुकसानीची नोंद होणार का, की पुन्हा पंचनामे केले जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रब्बी हंगामाची चिंता
भातपिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा राहिलेला नाही. त्यामुळे आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च कसा भागवायचा, याची चिंता त्यांना सतावत आहे. शासन आणि प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे दुबार पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना विनाविलंब योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply