हिंगोली जिल्हा प्रशासनाने महसुली अभिलेख अद्ययावत करावेत, अशा सूचना सह निबंधकांना केल्या आहेत. नियमाला बगल दिल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
भूखंडाची नोंदणी केव्हा करावी?
मंजूर विकास योजना व प्रादेशिक योजनेतील जमिनीवर मंजूर लेआऊटनुसार भूखंडांची खरेदी-विक्री करताना, प्रत्येक भूखंडाला कमी-जास्त पत्रकानुसार स्वतंत्र सातबारा उपक्रमांक किंवा प्रॉपर्टी कार्ड (पीआर कार्ड) मिळाल्यानंतरच त्या भूखंडाची दस्त नोंदणी करावी. तोपर्यंत वैयक्तिक भूखंडांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करू नये. खरेदी खतासोबत सक्षम प्राधिकरणाने मंजूर केलेल्या लेआऊटमधील त्या विशिष्ट प्लॉटचा चौहद्दीसह नकाशा, कमी-जास्त पत्रकानुसारचा नकाशा आणि अद्ययावत सातबारा जोडणे कायदेशीररित्या सक्तीचे करावे. मंजूर लेआऊटमधील रस्ते, मोकळी जागा आणि सुविधा क्षेत्रे उपक्रमांकनिहाय सातबाऱ्यामध्ये प्रतिबंधित मालमत्ता म्हणून नोंदविणे गरजेचे आहे.
जिल्हा निबंधकांनाही सूचना
विविध वापराच्या प्रयोजनासाठी मंजुरी दिलेल्या लेआऊटमधील भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी कमी-जास्त पत्रकानुसार अद्ययावत केलेल्या सातबारानुसार असल्यास करावी. मंजूर लेआऊटची कमी-जास्त पत्रकानुसार स्वतंत्र सातबारा किंवा पीआर कार्ड तयार नाही, अशा भूखंडाचे अभिलेख अद्ययावत केल्यानंतरच दस्त नोंदणी करावी, अशा सूचनाही जिल्हा निबंधकांना करण्यात आल्या आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply