धारावीत चामड्याच्या वस्तू स्वस्त आणि चांगल्या मिळतात, त्यामुळे देश-विदेशातून ग्राहक येथे येतात. दिवाळीत तर चामड्याच्या वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना गर्दीला आवरता-आवरता नाकी नऊ यायचे. मात्र, यंदाची दिवाळी सुनीसुनी जात आहे. दुकानदारांनी आपल्या दुकानात चामड्याच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत, मात्र दुकानात ग्राहकच फिरकत नसल्याने दुकानदार चिंतित झाले आहेत.
मोठ्या ऑर्डर मिळणे दुरापास्त
गेल्या अनेक वर्षांपासून धारावीतील दुकानदार दिवाळी चांगली जाईल, या आशेने दुकान सजवून ग्राहकांची वाट पाहत आहेत, पण अजूनही खरेदीसाठी ग्राहक येत नाहीत. त्यामुळे दुकानदार सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुकान उघडून ग्राहकांची वाट पाहत बसून असतात. पूर्वी मोठ्या कंपन्या आगाऊ सूचना देऊन त्यांना हव्या असलेल्या चामड्याच्या वस्तू बनवून घेत असत, त्यामुळे दुकानदारांना घसघशीत नफा होत होता. सध्या एकूणच बाजारात मंदीचे वातावरण असल्याने किरकोळ ग्राहकसुद्धा दुकानाकडे फिरकत नाहीत आणि मोठ्या ऑर्डर मिळणे दुरापास्त झाले आहे.
पूल खुला होऊनही आशा फोल
धारावीतील संत रोहिदास मार्गावर मोठ्या प्रमाणावर चामड्याच्या वस्तू विक्रीची दुकाने आहेत. सायन वाहतूक पूल बंद होता, म्हणून या दुकानदारांना नुकसान सहन करावे लागले होते. आता पूल खुला झाल्याने व्यवसाय चांगला होईल अशी आशा दुकानदारांना होती, मात्र ती फोल ठरली आहे.
दुकानदार आणि कारागीर आर्थिक संकटात
अनेक दुकानदार दुकान भाड्याने घेऊन व्यवसाय करत आहेत. दुकानात किमान दोन नोकर ठेवावे लागतात, मात्र सध्या दुकानदारांना नोकरांचे वेतन, दुकानाचे भाडे आणि वीजबिल भरणे अवघड झाले आहे. दिवाळीत व्यवसाय होत नसल्याने चामडे विक्री करणारे आणि चामड्याच्या वस्तू बनवणारे कारागीर यांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. ओम साई ब्रँडचे मालक राम भिवा कोकणे यांनी सांगितले की, ते गेल्या अनेक वर्षांपासून चामड्याच्या वस्तू विक्रीचे दुकान चालवत आहेत. दरवर्षी दिवाळीत जेवायला व घरी जायला वेळ मिळत नसायचा, मात्र यावर्षी सर्वच गणित बिघडले आहे. जीएसटीमुळे मोठ्या कंपन्या व व्यापारी माल उचलत नाहीत आणि दुष्काळ व एकूणच मंदीमुळे धंदा बसला असून मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply