गोमातेचे पूजन, वासरासह गाईची आराधना आणि तिच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करत गुरुवारी वसुबारस साजरी झाली. गोमाता पूजनाने दीपावलीच्या आनंदपर्वाला आजपासून प्रारंभ झाला असून, पुढील सहा दिवस लखलखत्या दिव्यांचा, तेजाचा आणि अपार आनंदाच्या या सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळणार आहे.
दसरा संपल्यानंतर दिवाळीची चाहूल लागली आणि सर्वत्र उत्साहाचे वारे वाहू लागले. दीपमाळ, आकाशदिवे आणि फराळाच्या पदार्थांची लगबग सगळीकडे सुरू झाली आहे. यंदाच्या सणावर दुष्काळाचे सावट असले, तरी सणाच्या निमित्ताने आनंदाचे चार क्षण वेचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिवाळीच्या या मंगल पर्वाची सुरुवात गुरुवारी गोमाता पूजनाने झाली. वसुबारसेनिमित्त सायंकाळी वासरासह गाईचे पूजन करण्यात आले.
सणांची तारीखवार माहिती
वसुबारसेनंतर शुक्रवारी, ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी आणि यमदीपदान आहे. यंदा नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी, म्हणजेच रविवारी, ८ नोव्हेंबरला आले आहे. नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करण्याचे महत्त्व असते. पुराणातील कथेप्रमाणे आश्विन अमावास्येस रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते. जेथे स्वच्छता, शोभा आणि आनंद आहे, अशा ठिकाणी ती आकर्षित होते. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर आणि दुकान झाडून, स्वच्छ करून, सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावयाची असते.
लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त
यंदा लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त सायंकाळी ५.५० ते रात्री १०.५० असा आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. मंगळवारी, १० नोव्हेंबरला बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा होईल. या दिवशी दानशूर बळीराजाचे पूजन केले जाते. या दिवशी व्यापारी नववर्षाची सुरुवात होत असल्याने वहीपूजन आणि दुकानपूजन करण्याची परंपरा आहे. वहीपूजनासाठी पहाटे २.१० ते ५.१०, सकाळी ६.३५ ते ७.२५ आणि सकाळी ११.०० ते दुपारी २.०० असे मुहूर्त आहेत. बुधवारी, ११ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply