केंद्र शासनाच्या पीएम-सेतू योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे स्वरूप बदलून त्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या गरजांशी जोडले जाणार आहे. पुढील पाच वर्षांत जिल्ह्यासाठी २४१ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यात केंद्राचा ५० टक्के (१२०.५० कोटी), राज्याचा ३३ टक्के (७९.५० कोटी) आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के (सुमारे ४१ कोटी) वाटा असेल.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शिरवळ येथील सयाजी हॉटेलमध्ये उद्योग प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची इंडस्ट्री मीट झाली. यात संचालक सतीश सूर्यवंशी, उपसंचालक रमण पाटील, सहसंचालक सचिन धुमाळ, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी, आयटीआय प्राचार्य आणि नामांकित व्यावसायिक सहभागी झाले.
हब अँड स्पोक मॉडेल
जिल्ह्यात हब अँड स्पोक मॉडेल राबवले जाईल. सातारा आयटीआय हे हब म्हणून काम करेल, तर वाई, मेढा, कोरेगाव आणि औंध-खटाव येथील आयटीआय स्पोक म्हणून जोडले जातील. हब संस्थेत चार नवीन व्यवसाय, तर प्रत्येक स्पोक संस्थेत दोन नवीन व्यवसाय सुरू होतील.
नवीन अभ्यासक्रम आणि उत्पादन केंद्रे
या निधीतून नवीन यंत्रसामग्री, आधुनिक कार्यशाळा आणि पायाभूत सुविधांचा विकास होईल. विद्यार्थ्यांसह शिक्षक, निदेशक आणि अधिकाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल. रोबोटिक्स, ड्रोन, इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर आणि इंडस्ट्री ५.० यांचे प्रशिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट होईल. इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर आणि पेंटर या पारंपरिक शाखांचेही अद्ययावतीकरण होईल.
प्रत्येक आयटीआयमध्ये स्वतंत्र प्रॉडक्शन सेंटर स्थापन केले जाईल. तेथे औद्योगिक सुटे भाग, शासकीय फर्निचर, कुलर्स आणि वेल्डिंग उत्पादने तयार होतील. यामुळे प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव, आर्थिक लाभ आणि संस्थेला महसूल मिळेल. चितळे, गरवारे, किर्लोस्कर, गोदरेज, टाटा कमिन्स, विप्रो अशा नामांकित उद्योगांच्या सहभागातून साताऱ्यातील ग्रामीण आणि शहरी तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply