मालाड पूर्वेतील आप्पापाडा परिसरातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोशी विधानसभा विभाग अध्यक्ष अॅड. भास्करभाऊ परब यांनी सोमवारपासून (ता. २) आमरण उपोषण सुरू केले आहे. आनंदनगर रिक्षा स्टँड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ हे आंदोलन सुरू असून नागरिकांचा त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे.
पुनर्वसन आणि मूलभूत सुविधांची मागणी
एमएमआरडीए, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), मुंबई महापालिका, वन विभाग आणि अग्निशमन दलाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत परब यांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे आणि परिसरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, ही प्रमुख मागणी आहे. एमएमआरडीए आणि एसआरएच्या माध्यमातून विकसित इमारतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करत संबंधित कामांची आणि अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पक्के रस्ते आणि हद्दी निश्चित करण्याची मागणी
प्रत्येक इमारतीपर्यंत पक्के रस्ते तयार करावेत, वन विभागाने हद्दी निश्चित कराव्यात आणि वनक्षेत्रातील पात्र झोपडीधारकांचे नियमानुसार पुनर्वसन करावे, अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या आहेत. प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागरी समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्यांची दखल घ्यावी आणि ठोस कार्यवाही करावी, असे आवाहन नागरिकांनी केले आहे. प्रशासन या मागण्यांवर काय कार्यवाही करते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply