नवी मुंबईतील दिघा, ऐरोलीसह विविध विभागांत फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्ते, पदपथ आणि रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीचे प्रश्नही गंभीर बनले आहेत. या समस्येवर महापालिकेच्या सभागृहात चर्चा झाली. नगरसेविका अपर्णा गवते आणि नगरसेवक मनोज हळदणकर यांनी प्रशासनाला धारेवर धरत अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आणि कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली.
ऐरोली स्थानकाबाहेर कोंडी, शासकीय लोगोचा गैरवापर
नगरसेविका गवते यांनी अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत महापालिकेकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. नगरसेवक हळदणकर यांनी ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेरील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या गाड्यांवर लोगो लावून काही विक्रेते व्यवसाय करत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला आणि अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
अपुऱ्या मनुष्यबळामुळे कारवाईत अडचणी
यावर अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त सुखदेव येडवे यांनी महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले. मात्र विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कारवाई करताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः रात्रीच्या वेळी फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. या पार्श्वभूमीवर महापौर सुजाता पाटील यांनी अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. संबंधित विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांऐवजी अन्य विभाग कार्यालयातील अतिक्रमण नियंत्रण पथक पाठवून कारवाई करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे दिघा आणि ऐरोली परिसरातील अतिक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रत्यक्षात कोणती पावले उचलली जातात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply