खानदेशात सण-उत्सव आणि लग्नसराई जवळ येत असताना लिंबाच्या दराने उच्चांक गाठला आहे. ऐन सणासुदीत किरकोळ बाजारात लिंबू प्रतिकिलो शंभर रुपयांपार गेला आहे. एका लिंबासाठी ग्राहकांना आठ ते दहा रुपये मोजावे लागत आहेत, तर घाऊक बाजारातही ७० ते ११० रुपये किलो दर मिळत आहे. या दरवाढीमुळे लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दुष्काळामुळे उत्पादन घटले, आवक कमी
खानदेशात लिंबू बागायतीचे क्षेत्र वाढले असले, तरी दुष्काळसदृश परिस्थितीचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने स्थानिक उत्पादन घटले आहे. आवक कमी झाल्याने दरात झपाट्याने वाढ झाली आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी आंध्र प्रदेशातून लिंबाची आवक सुरू झाली आहे, तरीही दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. हॉटेल, खानावळ, ज्यूस सेंटर आणि घरगुती वापरामुळे लिंबाची मागणी कायम राहते.
काही दिवसांपूर्वी दोन ते तीन रुपयांना मिळणारे लिंबू आता थेट दहा रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या पाच महिन्यांतील सरासरी दर पाहिले तर ही वाढ स्पष्ट दिसते. जूनमध्ये ३५ ते ४५ रुपये किलो असलेला दर जुलैमध्ये ४५ ते ६०, ऑगस्टमध्ये ६० ते ८०, सप्टेंबरमध्ये ८० ते ९० आणि ऑक्टोबरमध्ये ९० ते ११० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.
हस्त बहरालाही मागे टाकणारे दर
लिंबू उत्पादकांसाठी हस्त बहराचा हंगाम सर्वात फायदेशीर मानला जातो, कारण उन्हाळ्यात त्याला ५० ते १०० रुपये किलो दर मिळतो. मात्र सध्याच्या दरांनी हस्त बहरालाही मागे टाकले आहे. दुष्काळात इतर पिके वाया गेली असताना लिंबू उत्पादकांना या दरवाढीने गारवा दिला आहे, असे चित्र आहे. धुळे जिल्ह्यातील धनूर, कापडणे, न्याहळोद, लामकानी, शिरडाणे, कुसूंबा, नेर, खेडे, मुकटी आणि आर्वी परिसरातील बागायतदार लिंबू लागवडीकडे वळले आहेत. मात्र बागांवर दुष्काळाचा तीव्र फटका बसण्याची चिंताही शेतकऱ्यांमध्ये आहे.
पुढील काळात आवक कशी राहते आणि दर कुठे स्थिरावतात, याकडे शेतकरी आणि ग्राहक दोघांचेही लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply