राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी सोमवारी गंगापूर तालुक्याचा विशेष दुष्काळ पाहणी व शेती नियोजन दौरा केला. यादरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकरी व महिला बचत गटातील महिलांशी संवाद साधला. बचत गटाकडून केल्या जाणाऱ्या शेतीची पाहणी करून त्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन आणि चारा लागवडीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
चारा टंचाई टाळण्यासाठी नियोजन
दुष्काळ परिस्थितीत जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी आयुक्तांनी जामगाव येथील शेती महामंडळाच्या गट नंबर ४६ मधील चारा लागवडीसाठी नियोजित जमिनीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अंतापूर येथील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेलाही त्यांनी भेट दिली. तसेच ऊस पाचट टाकून अस्तरीकरण केलेल्या प्लॉटची व शेततळ्याची पाहणी केली.
शेततळ्यातील पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने व योग्य पद्धतीने करून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या कृषी कन्या गट प्रक्षेत्रालाही आयुक्तांनी भेट दिली. या गटामधील महिला सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. खरीप हंगामात राबविलेल्या विविध उपक्रम व घटकांची माहिती यावेळी देण्यात आली. या दौऱ्यावेळी विविध अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply