संगमनेर तालुक्यातील पिंपरने गावातील सात बचत गटांनी आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि परस्पर विश्वासाच्या जोरावर सामूहिक विकासाचा आदर्श घालून दिला आहे. वर्षभरातील आर्थिक व्यवहारातून मिळालेल्या नफ्यातून सभासदांना किराणा साहित्य आणि रोख लाभांश देण्यात आला, त्यामुळे या गटांच्या सभासदांची दिवाळी गोड झाली. या सातही गटांची एकत्रित वार्षिक उलाढाल एक कोटी ८५ लाख रुपये असून निव्वळ नफा १४ लाख ५० हजार रुपये झाला आहे.
प्रत्येक गटाचे वाटप वेगळे
युनिटी कृषी, विघ्नहर्ता महिला, सह्याद्री कृषी, राजमाता महिला, हिमालय कृषी, सखी महिला आणि एव्हरेस्ट कृषी या गटांच्या वतीने दिवाळीनिमित्त लाभांश आणि किराणा साहित्य वाटप कार्यक्रम झाला. विघ्नहर्ता महिला गटाने सभासदांना पाच किलो साखर आणि पाच लिटर तेल दिले. युनिटी कृषी गटाने प्रत्येकी १५ हजार रुपये रोख लाभांश, ५० किलो साखर आणि १५ लिटर तेल दिले. राजमाता महिला गटाने ५० किलो साखर, १५ लिटर तेल, दोन किलो तूप आणि दोन किलो हरभरा डाळ दिली. सह्याद्री कृषी आणि हिमालय कृषी गटांनी प्रत्येकी ५० किलो साखर व १५ लिटर तेल दिले, तर सखी महिला गटाने १५ किलो साखर व १५ लिटर तेल दिले. एव्हरेस्ट कृषी गटाने प्रत्येक सभासदाला १५ लिटर तेलाचा डबा भेट दिला.
आर्थिक यशापलीकडे सामाजिक काम
या कार्यक्रमाला सुमारे ६० महिला आणि ८० पुरुष सभासदांसह ग्रामस्थ उपस्थित होते. बचत गटांच्या माध्यमातून गावात सकाळ व्यायाम गट स्थापन करण्यात आला असून त्याच्या पुढाकारातून राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. गावातील सुशिक्षित आणि नोकरदार तरुणांनी पुढाकार घेऊन अग्निपंख अभ्यासिका सुरू केली आहे. तसेच हैदराबाद, रामोजी फिल्म सिटी, कळसूबाई, रतनगड, रायगड आणि विश्रामगड अशा ऐतिहासिक व पर्यटनस्थळांच्या सहली यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. यंदा उज्जैन तसेच अयोध्येतील राममंदिर दर्शनासाठी विमानाने सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply