हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागांत शेतकरी रब्बी हंगामाच्या पेरणीच्या कामाला लागले आहेत. विहिरी, कूपनलिका आणि शेततळ्यांमध्ये साठलेल्या पाण्याच्या आधारावर गहू, हरभरा यांसह विविध रब्बी पिकांची पेरणी सध्या सुरू आहे. मात्र वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पाणीटंचाई आणि विजेची अडचण
जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामासाठी दोन लाख २५ हजार ५२१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीत पुरेसा ओलावा तयार झालेला नाही. त्याचबरोबर विहिरी आणि बोअरवेलमधील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पेरणी करताना अडचणी येत आहेत. रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी विद्युतपंपांचा वापर करतात. परंतु सध्या वीजपुरवठा सुरळीत राहत नसून कमी-अधिक दाबाने वीज मिळत असल्याने विहिरी आणि बोअरमधील मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. मोटार दुरुस्त करायची झाली किंवा नवीन मोटार घ्यायची झाली, तर शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च सोसावा लागतो.
मोटार जळाली की हजारोंचा फटका
विहिरी आणि बोअरमध्ये वेगवेगळ्या क्षमतेच्या मोटारी बसवलेल्या असतात. कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होणे आणि पुरवठ्यात बिघाड होणे यामुळे मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. एकदा मोटार जळाली की दुरुस्तीसाठी दोन ते तीन हजार रुपयांचा खर्च येतो. सात ते दहा एचपीच्या मोटारींना तीन ते चार हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. एकीकडे पाणीसाठ्याची कमतरता आणि दुसरीकडे अनियमित वीजपुरवठा या दुहेरी संकटामुळे यंदा जिल्ह्यातील रब्बीचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृषिपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply