इगतपुरी तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांची शिधापत्रिका कोणतीही अधिसूचना, नोटीस अथवा पूर्वमाहिती न देता अचानक बंद करण्यात आली आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत आणि दिवाळीच्या तोंडावर धान्य बंद झाल्याने गावांगावात नाराजी पसरली आहे. पुरवठा विभाग आणि सेतू कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
तालुक्यात जवळपास चार हजार तीनशे शिधापत्रिकाधारक ‘एनपीएच’ वर्गात गेले आहेत. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण आदिवासीबहुल भागातील गोरगरीब, भूमिहीन आणि बेरोजगार कुटुंबांना बसला आहे. या कुटुंबांसाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून मिळणारे धान्य हाच उदरनिर्वाहाचा मुख्य आधार होता. अचानक धान्य बंद झाल्याने दिवाळीत अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
कार्डे का बंद झाली?
सहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले कार्डधारक, कर भरणारे ग्राहक, जास्त जमीन असलेले आणि चारचाकी वाहन असलेले ग्राहक यांची कार्डे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकांमधून मृत व्यक्तींची नावे कमी न केल्यामुळेही काही कार्डे बंद झाली आहेत. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील भूमिहीन, अल्पभूधारक व मोलमजुरी करणाऱ्या ग्राहकांनी आयटी रिटर्न भरल्यास त्यांचीही कार्डे बंद झाल्याचे समोर आले आहे.
नागरिकांच्या मागण्या
गावपातळीवर तत्काळ ग्रामसभा घेऊन या निर्णयाविरोधात प्रशासनाकडे रेशनकार्ड तातडीने सुरू करण्याची आणि दिवाळीत धान्य वितरित करण्याची मागणी होत आहे. ग्राहकांनी संबंधित रेशन दुकानदार, पुरवठा अधिकारी आणि तहसीलदारांकडून फेरतपासणी करून निकष रद्द करून कार्डे तत्काळ सुरू करावीत, अशी मागणी केली आहे. कर भरणाऱ्या व्यक्तीचे कार्ड बंद करण्याऐवजी प्राधान्य, अंत्योदय, भूमिहीन आणि अल्पभूधारकांची स्वतंत्र यादी बनवावी, ग्रामीण भागातही रेशन धान्यासाठी स्मार्ट एटीएम सुविधा सुरू करावी, रेशन दुकानदारांना नवीन बायोमेट्रिक टॅब मशिन द्यावी आणि कार्डधारकांना शिधापत्रिकेऐवजी स्मार्ट एटीएम कार्ड द्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. टाकेद बुद्रुक येथील रहिवाशांनी गावपातळीवर गरजू भूमिहीन कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांची कार्डे ऑनलाइन धान्यासह पूर्ववत सुरू करावीत आणि ग्रामपंचायत स्तरावर पुन्हा सर्वेक्षण करून गोरगरीबांचे रेशन तातडीने चालू करावे, अशी मागणी केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply