सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

श्रीक्षेत्र चांगदेव: अध्यात्म अन् पर्यटनाचे केंद्र

तापी-पूर्णा संगमावरील श्रीक्षेत्र चांगदेव हे पुरातन देवस्थान असून हेमाडपंथी शिल्पकला, नौकाविहार व अध्यात्मिक आख्यायिकांमुळे भाविक-पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.

श्रीक्षेत्र चांगदेव: अध्यात्म अन् पर्यटनाचे केंद्र

मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांगदेव हे खानदेशातील पुरातन देवस्थान म्हणून आणि पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तापी आणि पूर्णा या नद्यांच्या संगमामुळे हे स्थळ नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. संत चांगदेवांच्या चौदाशे वर्षांच्या तपश्चर्येमुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अथांग जलाशय, पुरातन मंदिर आणि नैसर्गिक सौंदर्य यामुळे येथे पर्यटकांसह भाविक वर्षभर भेटी देत असतात.

संत चांगदेव मंदिर इसवी सन पूर्व ५०० म्हणजे २५०० वर्षांपूर्वीचे आहे, असे सांगितले जाते. या ठिकाणी पूर्वी दंडकारण्य होते. दंडकारण्यात तापी व पूर्णा या नद्यांचा संगम आहे. पूर्वी तापीला सूर्यकन्या व पूर्णा नदीला चंद्रकन्या म्हणून संबोधले जात असे. त्यामुळे तापीचे पाणी गरम, तर पूर्णेचे पाणी थंड असते, अशी येथील समजूत आहे. या नद्यांच्या संगमावर अहिल्याबाई होळकर आणि सोमेश्वर महादेव यांची प्राचीन मंदिरे होती. आज फक्त सोमेश्वर महादेव मंदिर असून अहिल्याबाईंचे मंदिर बुडाले आहे. चांगदेव महाराजांच्या मंदिराचे पूर्वीचे नाव सूर्यमंदिर असे होते.

चांगदेवांची आख्यायिका

आख्यायिकेनुसार या ठिकाणी श्री संत चांगदेव महाराजांनी कर्दळीच्या पानावर अवतार घेतला. त्यानंतर गुरुप्राप्ती व ब्रह्मज्ञानप्राप्तीसाठी त्यांनी पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. त्यामुळे ते परत सुंदर क्षेत्र भिन्नापूर म्हणजेच आजच्या श्रीक्षेत्र चांगदेव येथे आले. येथे त्यांना श्री लक्ष्मी-नारायण या उभयतांनी साक्षात दर्शन दिले.

एके दिवशी ते अंघोळीला नदीवर गेले असता परत येताना त्यांनी वाटीभर वाळू घेतली आणि या ठिकाणी असलेल्या मंदिरात आले. या वाटी आणि वाळूपासून वटेश्वर लिंग स्थापन करून त्यांनी तपश्चर्येस सुरुवात केली. त्यांच्या तपश्चर्येची कालगणना ९८ वर्षांची असल्याची आख्यायिका आहे. जेव्हा यमदूत त्यांना घ्यायला यायचा, त्या वेळी ते आपला आत्मा ब्रह्मांडात घेऊन जाऊन समाधीत मग्न असायचे. त्यामुळे यमाला त्यांचे प्राण हरण करता येत नसे आणि तो रिक्त हस्ताने परत जात असे. त्यांनी असे १४ वेळा यमाला परत पाठविले. १०० वर्षांची समाधी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा समाधिस्थ होताना ते स्वतःचे नाव बदलत असत. वटेश्वर चांगा, चक्रपाणी चांगा आदी नावे त्यांची आहेत. वाळूपासून बनविलेल्या महादेवाच्या लिंगातून शंकर-पार्वती यांनी महाराजांना साक्षात दर्शन दिले. त्यामुळे या ठिकाणचे माहात्म्य वाढून ते तीर्थस्थळ बनले.

मंदिराचे बांधकाम आणि शिल्पकला

चांगदेव महाराजांच्या मंदिराचे बांधकाम सहा महिन्यांच्या रात्रींमध्ये झाले, अशी आख्यायिका आहे. या मंदिराचा सभामंडप हा छत्तीस खांबांचा असून, त्या रात्री पूर्ण न होऊ शकल्याने तो अपूर्ण व ओपन परिस्थितीत आजही आहे. येथे लक्ष्मी-नारायणाचे वाहन असलेल्या गरुडाची मूर्ती असून ती एकाच दगडाची आहे. तिची उंची जवळपास दहा फूट आहे. काही अपूर्ण राहिलेले बांधकाम दगडाच्या शिलेत आहे आणि जे विटकाम दिसते ते शिवकालीन, म्हणजे ३५० वर्षांपूर्वीचे आहे. या मंदिराच्या विटा आजही पाण्यावर तरंगत असतात, हे विशेष आहे. मंदिर हे द्रविड प्रकारचे आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूस १०१ मूर्ती कोरलेल्या असून उत्कृष्ट शिल्पकलेचे नयनरम्य दर्शन घडते. सकाळी सूर्य नारायण निघाले की मूर्तींवर सूर्यकिरणे पडतात, म्हणून याला सूर्यमंदिर असेही म्हटले जाते. हे मंदिर हेमाडपंथी शिल्पकलेचा नमुना मानले जाते.

पर्यटकांसाठी सुविधा आणि अपेक्षा

तापी-पूर्णा नद्यांच्या अथांग जलाशयामुळे येथील परिसर विविध सौंदर्याने नटलेला आहे. संगमाच्या जलाशयात नौकाविहाराचा आनंद प्रत्येक पर्यटक घेत असतो. हा आनंद पर्यटकांना लुटण्यासाठी २० ते २५ नौका येथे नेहमीच सज्ज असून संगम दर्शनाचा लाभ पर्यटकांना देत आहेत. पर्यटकांना पोहण्याचा आनंद बाराही महिने घेता येतो.

हे मंदिर पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असल्याने येथे मंदिर जीर्णोद्धार वेळोवेळी होत असतो. दोन नद्यांच्या संगमामुळे येथे नानाविध धार्मिक विधी होत असतात. परंतु वर्षांपूर्वी येथे बांधलेला स्नान घाट दोन वर्षांपूर्वी पूर्णपणे ढासळलेला आहे. तसेच भाविकांच्या व पर्यटकांच्या वर्दळीमुळे येथे शौचालय आणि राहण्याची व्यवस्था नाही. स्नान घाट, भक्त निवास तसेच भोजनालय यासारख्या सुविधा पुरातत्त्व विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी अपेक्षा पर्यटक आणि भाविकांमध्ये आहे.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance