रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी डहाणू रोड रेल्वे स्थानकावर रोटरी क्लबच्या पुढाकाराने २८ ऑक्टोबर रोजी ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (एईडी) मशीन बसविण्यात आली आहे. या सुविधेमुळे हृदयक्रिया बंद पडण्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना तातडीची मदत मिळण्यासह प्राण वाचविण्याची शक्यता वाढणार आहे.
पहिली काही मिनिटे निर्णायक
रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीची हृदयक्रिया अचानक बंद पडल्यास पहिल्या काही मिनिटांत मिळणारी मदत निर्णायक ठरते. अशा वेळी एईडी मशीन हृदयाच्या ठोक्यांमधील जीवघेणा अनियमितपणा ओळखून आवश्यकतेनुसार विद्युत धक्का देण्यास मदत करते. सीपीआर आणि एईडीचा वेळेत वापर केल्यास रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता वाढते.
विशेष म्हणजे एईडी मशीन वापरण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञ असणे आवश्यक नाही. मशीन सुरू केल्यानंतर ध्वनिसूचनांद्वारे वापरकर्त्याला पुढील कृतींबाबत मार्गदर्शन केले जाते. या सुविधेचा आपत्कालीन प्रसंगी प्रभावी वापर करता यावा यासाठी स्थानकावरील स्टेशन मास्तर आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रवाशांनी काय करावे
स्थानकावर एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध पडल्यास प्रवाशांनी तातडीने रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती देणे आवश्यक आहे. अशा वेळी वैद्यकीय मदत बोलावून सीपीआर सुरू करणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने एईडी मशीनचा वापर करणे महत्त्वाचे ठरणार आहे. या उपक्रमावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी, रेल्वे सुरक्षा दलाचे प्रतिनिधी, मुंबई व स्थानिक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गर्दीच्या रेल्वे स्थानकावर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply