कोणत्याही कामाला हात घालण्यापूर्वी अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा ते काम करून पाहणे अधिक महत्त्वाचे असते. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा यश मिळतेच, असा विश्वास एलएपीएल ऑटोमोटिव्ह लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक नीरज गोयल यांनी व्यक्त केला आहे. वाहन क्षेत्रातील अनुभव, व्यवसायातील आव्हाने, उत्पादनांची विविधता, औद्योगिक धोरणांविषयीच्या अपेक्षा आणि तरुणांसाठीचा संदेश या विषयांवर त्यांनी एका विशेष संवादात आपली भूमिका मांडली.
दिल्लीतील नोकरीपासून उद्योग उभारणीपर्यंत
पदवी घेतल्यानंतर साधारण ३६ वर्षांपूर्वी गोयल यांनी दिल्लीतील एका कंपनीत कामाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांना उत्पादन, पुरवठा, ग्राहकांच्या गरजा आणि कंपनीचे व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. फेब्रुवारी १९९७ मध्ये ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि येथील एका नामांकित कंपनीसाठी तसेच दिल्लीतील एका कंपनीला दिवे पुरविण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. इमारत, कर्ज, यंत्रसामग्री, अनुदान आणि विक्रेता कोड यांची प्रक्रिया अल्पावधीत पूर्ण करून त्यांनी अनेक वर्षे या उत्पादनांचा पुरवठा केला.
मात्र व्यवसायाच्या वाटचालीत अडचणीही आल्या. पूर्वीच्या कंपनीचा पुरवठा २००० मध्ये थांबला आणि त्यानंतर २००३ मध्ये शहरातील कंपनीचा पुरवठाही बंद करावा लागला. अनुदानाशी संबंधित आर्थिक जबाबदारीही त्यांच्यावर होती. तरीही त्यांनी हे युनिट बंद न करता नव्या जोमाने व्यवसायाला पुन्हा सुरुवात केली. इतर कंपन्यांच्या वाहनांसाठी टेल लॅम्प आणि फ्रंट लॅम्प तयार करण्याची संधी मिळाल्यानंतर कंपनीने पुन्हा उभारी घेतली. ग्राहकाची अडचण समजून घेऊन त्यावर उपाय देणे हाच आपल्या व्यवसायाचा प्रमुख सिद्धांत राहिला आहे, असे गोयल सांगतात. किंमत ठरविण्याआधी ग्राहकाची समस्या जाणून घेण्याच्या पद्धतीमुळेच व्यवसायात विश्वास निर्माण झाला, असेही त्यांचे म्हणणे आहे.
पायाभूत सुविधा, इलेक्ट्रिक वाहने आणि तरुणांसाठी संदेश
छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी आणि डीएमआयसी या औद्योगिक परिसरांना समृद्धी महामार्गामुळे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात चालना मिळत आहे. आगामी काळात येथील औद्योगिक विकासाचा वेग वाढेल, पण त्यासाठी अंतर्गत रस्त्यांची देखभाल, सार्वजनिक वाहतूक आणि कामगारांना कारखान्यांपर्यंत सहज पोहोचण्याची सुविधा याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी गरज गोयल यांनी व्यक्त केली.
तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे, असे त्यांचे मत आहे. मूलभूत शिक्षण आणि ज्ञान आवश्यक आहेच, पण त्याचा उपयोग प्रत्यक्ष कौशल्य विकासासाठी व्हायला हवा. व्यवसायात नैतिकता, ग्राहकांना मदत करण्याची वृत्ती आणि टीमवर विश्वास असेल तर प्रगती निश्चित होते, असा त्यांचा विश्वास आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे मोटर्स, मिरर, लायटिंग आणि इतर घटकांच्या उत्पादनाला मोठी संधी उपलब्ध होत आहे. पारंपरिक इंजिनावरील वाहनांमधील काही उत्पादनांची मागणी पुढील काही वर्षे कायम राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
सध्या एलएपीएल ऑटोमोटिव्ह लाइटिंग, छोट्या मोटर्स, मिरर आणि सॉफ्ट कॅनोपी ही उत्पादने तयार करते. वाहनांचे दिवे, इंडिकेटर्स, स्टार्टर मोटर्स, आर्मेचर, रोटर-स्टेटर, वायपर मोटर्स, डीसी फॅन्स आणि मिररमधील मोटर यांसारख्या विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. इलेक्ट्रिक वाहनांसाठी सॉफ्ट कॅनोपी आणि स्टिचिंग उत्पादनेही तयार केली जात आहेत. पारंपरिक लेन्स डिझाइनऐवजी रिफ्लेक्टरवर मल्टिफोकल रिफ्लेक्शन डिझाइन विकसित केल्यामुळे कंपनीला डिझाइनसह लॅम्प विकसित करू शकणारी कंपनी अशी बाजारातील ओळख मिळाली आहे. कंपनीच्या विस्तारासाठी नवीन युनिट उभारले जात असून त्यासाठी मोठी गुंतवणूक केली जात आहे. सार्वजनिक समभाग विक्रीतून मिळणारा निधी नवीन उत्पादन युनिटसाठीचा भांडवली खर्च, काही कर्जांची परतफेड आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाणार आहे. कंपनीशी प्रत्यक्षरीत्या २०० हून अधिक कर्मचारी आणि कंत्राटी मनुष्यबळ जोडलेले असून पुरवठा साखळीशी पाचशेहून अधिक विक्रेते जोडलेले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply