संध्याकाळी चहासोबत काहीतरी चविष्ट आणि कुरकुरीत खायची इच्छा झाली असेल, तर चीज बॉल्स हा उत्तम पर्याय आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून चीजने भरलेले हे बॉल्स लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात. घरी उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यातून हे चीज बॉल्स सहज बनवता येतात. पाहूया ही सोपी रेसिपी.
लागणारे साहित्य
३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे, अर्धा कप ब्रेड क्रम्ब्स, २ चमचे कॉर्नफ्लोअर, १०० ग्रॅम मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ओरेगॅनो, चवीनुसार मीठ, २ चमचे मैदा, तळण्यासाठी तेल आणि कोटिंगसाठी ब्रेड क्रम्ब्स.
बटाटे उकडून मिश्रण तयार करा
सर्वप्रथम बटाटे कुकरमध्ये उकडून घ्या. थंड झाल्यावर त्यांची साल काढून चांगले मॅश करा. बटाट्यांमध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर एका भांड्यात मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात ब्रेड क्रम्ब्स, कॉर्नफ्लोअर, मीठ, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि थोडा ओरेगॅनो घालून चांगले मिक्स करा.
चीज भरून बॉल्स तयार करा आणि तळा
आता मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीजचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. तयार बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा हातावर घ्या, तो थोडा चपटा करून मध्यभागी चीजचा तुकडा ठेवा आणि मिश्रणाने चीज पूर्णपणे झाकून गोल आकार द्या. एका भांड्यात मैदा आणि थोडे पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा. दुसऱ्या भांड्यात ब्रेड क्रम्ब्स घ्या. तयार बॉल्स आधी मैद्याच्या मिश्रणात बुडवा आणि नंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्या.
कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात तयार बॉल्स सोडा. मध्यम आचेवर ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आणि टिश्यू पेपरवर काढा. तयार गरमागरम चीज बॉल्स प्लेटमध्ये काढा, त्यावर थोडे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो भुरभुरवा. टोमॅटो केचप किंवा मेयोनीजसोबत हे कुरकुरीत चीज बॉल्स सर्व्ह करा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply