दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी बहुतांशी प्रवाशांनी आगाऊ बुकिंगला पसंती दिल्याने नाशिकमध्ये खासगी ट्रॅव्हल्सचे आतापर्यंत सुमारे ४० ते ५० टक्के बुकिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स चालकांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. येत्या दोन दिवसांत शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना सुट्ट्या लागल्यानंतर प्रवाशांची संख्या आणखी वाढणार आहे. या वाढत्या मागणीमुळे ट्रॅव्हल्सच्या तिकीट दरांमध्ये ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गावाची ओढ आणि आगाऊ बुकिंगचा ओघ
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने काम आणि शिक्षणानिमित्त घरापासून दूर असलेल्यांना गावाची ओढ लागली आहे. शासकीय कार्यालयांना दिवाळीच्या दोन ते तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत, तर खासगी कंपन्यांमधील कर्मचारी व व्यावसायिकही सुट्ट्या घेऊन गावी निघत आहेत. सुकर आणि गर्दीमुक्त प्रवासासाठी अनेक नागरिक खासगी लक्झरी बसेसला पसंती देत आहेत. सुट्ट्या लागताच वेळेवर तिकीट मिळणार नाही या भीतीपोटी आगाऊ बुकिंगचा ओघ वाढला असून सुमारे २० ते २५ टक्के नागरिकांचा प्रवास आत्तापासूनच सुरू झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत प्रवाशांची गर्दी वाढण्याचा अंदाज आहे.
अशीच परिस्थिती राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस आणि रेल्वेस्थानकांवरही पाहायला मिळत आहे. सध्याही बस स्थानकांवर गर्दी दिसत असून बुधवार-गुरुवारनंतर त्यात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वे तिकिटांच्या आगाऊ बुकिंगमध्येही मोठी वाढ झाली आहे.
पुणे-मुंबई प्रवाशांची संख्या अधिक
खासगी ट्रॅव्हल्स किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या पुणे आणि मुंबईच्या प्रवाशांची आहे. पुणे व मुंबईतील काही नागरिक काम किंवा शिक्षणानिमित्त नाशिक शहरात आले आहेत, तर नाशिक शहरातील अनेक नागरिक व विद्यार्थी याच कारणांमुळे पुणे आणि मुंबईत राहत आहेत. दिवाळीनिमित्त हे सर्व नागरिक आता आपापल्या गावी परतत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply