चित्रपटांत, मालिकांत आणि गावोगावच्या लोककथांमध्ये एक दृश्य वारंवार दिसते — जमिनीत पुरलेल्या खजिन्यावर साप वेटोळे मारून बसलेला असतो, जणू तो त्या धनाचा रखवालदारच आहे. जुन्या वाड्यांबद्दल, किल्ल्यांबद्दल बोलताना तर हमखास सांगितले जाते की तिथल्या गुप्त धनाचे साप रक्षण करतात. पण हे खरे आहे का, की केवळ एक समज आहे?
साप आणि गुप्त धन यांचा संबंध काय?
सर्पतज्ज्ञांच्या मते साप आणि गुप्त धन यांचा काहीएक संबंध नसतो. साप गुप्त धनाचे रक्षण करतो हा दावा तथ्यहीन असून ही एक मोठी अंधश्रद्धा आहे. सापाला सोन्या-चांदीशी किंवा खजिन्याशी काहीही देणेघेणे नसते. मग हा समज निर्माण झाला तरी कसा, हे समजून घेण्यासाठी सापांच्या सवयींकडे पाहावे लागते.
मग जुने वाडे आणि किल्ल्यांत साप का दिसतात?
अनेकदा जुने पडीक वाडे, किल्ले, त्यांची तळघरे आणि अडगळीच्या जागांमध्ये मोठे साप आढळतात. ते पाहून अनेकांची बोबडी वळते आणि मग ते साप तिथल्या संपत्तीचे रक्षण करतात, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात या अडगळीच्या जागीच सापांचे भक्ष्य सहज मिळते. उंदीर, घूस आणि इतर लहान प्राणी अशा ठिकाणी वावरतात आणि तेच सापांचे मुख्य अन्न आहे. शिवाय अशी जागा सुरक्षित असल्याने आणि तिथे अंडी घालण्यासाठी योग्य तापमान मिळत असल्याने साप पडीक वाडे, किल्ले आणि गढ्यांचा आश्रय घेतात. त्यातूनच ते गुप्त धनाचे संरक्षण करतात, असा समज पक्का झाला आहे.
पूर्वीच्या काळी लोक आपले सोने-चांदीचे दागिने आणि नाणी जमिनीखाली पुरून ठेवत असत. काळाच्या ओघात ती माणसे युद्धात मारली गेली किंवा तो परिसर शत्रूच्या ताब्यात गेला, तर ते धन जमिनीत पुरलेलेच राहिले. अशा जागा अडगळीत असल्याने आणि तिथे भक्ष्य मिळत असल्याने खोदकामाच्या वेळी गुप्त धनासोबत अनेकदा साप, सापाची अंडी किंवा पिल्लेही सापडली आहेत. त्यावरून हा समज आणखी दृढ झाला. सापाची दृष्टी अंधूक असते; तो कंपनावरून आणि गंधाच्या साहाय्याने परिसराचा, वस्तूंचा आणि प्राण्यांचा अंदाज घेतो. त्यामुळे सोन्याच्या हंड्यावर किंवा गुप्त धनावर बसून तो त्यांचे रक्षण करतो, असे म्हणणे चुकीचे असल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
या लोककल्पनेचा गैरफायदा घेऊन अनेक भोंदू भोळ्याभाबड्या लोकांची फसवणूकही करतात. जुने वाडे किंवा गढी असलेल्या लोकांना गाठून तुमच्या परिसरात गुप्त धन असल्याचा दावा केला जातो. त्या भागात खोदकाम किंवा साफसफाई करायला घेतल्यावर साप आढळला की त्याआधारे गुप्त धन असल्याचा दावा करून फसवणूक केली जाते. त्यामुळे अशा आमिषांना बळी न पडता सावध राहणे हेच शहाणपणाचे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply