थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त अल्पसंख्याक विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अल्पसंख्याक समाजातील महिला, विद्यार्थी व नागरिकांपर्यंत महात्मा फुले यांचे विचार पोहोचवणे, हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
शैक्षणिक उपक्रम आणि ग्रंथ कोपरे
महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या रील्स व व्हिडिओ क्लिप तयार करून त्या विभागाच्या संकेतस्थळावर तसेच समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेंतर्गत मदरशांमध्ये विज्ञान, गणित व वाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये मराठी, उर्दू व हिंदी भाषेतील महात्मा फुले यांचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा फुले ग्रंथ कोपरा स्थापन करण्यात येणार आहे. हा उपक्रम ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये २३ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘सत्यशोधक विचार’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धांतील विजेत्यांना ११ एप्रिल २०२७ रोजी महात्मा फुले जयंतीदिनी पारितोषिके देण्यात येतील.
उर्दू अनुवाद आणि नव्या योजना
महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत महात्मा फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ या निवडक ग्रंथांचा उर्दू अनुवाद करून त्यांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. याशिवाय अल्पसंख्याक समाजातील विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी आर्थिक मदत देणे, तसेच महिलांना स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीकरिता अनुदान देण्याच्या नवीन योजना प्रस्तावित केल्या आहेत. या उपक्रमांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply