विखरण येथील देवरे माध्यमिक विद्यालयात ई-कचऱ्याबाबत जनजागृती करणारे विशेष अभियान राबवण्यात आले. श्री. आप्पासो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात ई-कचरा संकलन व जबाबदार विल्हेवाट हा उपक्रम घेण्यात आला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, संगणक आणि लॅपटॉपसारखी उपकरणे कालबाह्य झाल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावणे किती गरजेचे आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
निकामी उपकरणांमुळे प्रदूषणाचा धोका
निकामी झालेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यातील घातक घटकांमुळे माती, पाणी आणि पर्यावरणाचे प्रदूषण होऊ शकते, असे मत शिक्षक डी. बी. भारती यांनी व्यक्त केले. त्यामुळे ई-कचऱ्याचे स्वतंत्र संकलन करून अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्रामार्फत त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उपशिक्षक सी. व्ही. नांद्रे यांनी या अभियानातून विद्यार्थ्यांना ई-कचऱ्याचे दुष्परिणाम, त्याचे वर्गीकरण, सुरक्षित संकलन, पुनर्वापर आणि जबाबदार विल्हेवाट याविषयी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांनी ई-कचरा योग्य ठिकाणी द्या आणि पर्यावरणाच्या रक्षणात आपला वाटा उचला, असा संदेश दिला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव, सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत विकासाची मूल्ये रुजवणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली. या विषयावर प्रश्नमंजुषा कार्यक्रम आणि निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी ई-कचरा, माऊस, की-बोर्ड तसेच निरुपयोगी मोबाईल फोन आणि हेडफोन कुंडीत टाकून मोहिमेला सुरुवात केली. वाय. डी. बागूल यांनी सूत्रसंचालन केले, तर ए. एस. बेडसे यांनी आभार मानले. उपशिक्षक एम. डी. नेरकर, डॉ. आर. आर. बागूल, एम. एस. मराठे, एस. एच. गायकवाड, जे. एस. पाटील, एस. जी. पाटील आणि एच. एम. खैरनार या वेळी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply