गोदावरी नदीच्या तीरावर होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा हे भारतीय संस्कृतीच्या विराट स्वरूपाचे दर्शन घडवणारे पर्व आहे. ३१ ऑक्टोबरपासून ध्वजारोहणाने या पर्वाला प्रारंभ होत आहे. कुंभमेळ्याचा एकूण कालावधी २० महिने तीन आठवडे, म्हणजेच ६३२ दिवस असून, मुख्य कार्यक्रम १५ जून ते ३० सप्टेंबर २०२७ या काळात होतील. सिंहस्थासाठी १० ते १२ कोटी भाविक भेट देतील, असा अंदाज आहे. कुंभमेळा व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजारोहण विशेष पुरवणी लेखात ही भूमिका मांडली आहे.
कुंभमेळ्याकडे राज्य शासनाचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय म्हणून पाहिले जात असून, शिखर समिती आणि कुंभमेळा मंत्री समितीच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवले जात आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून विकासकामांना गती मिळाली आहे. सिंहस्थासाठी ३७३ हून अधिक विकासकामे सुरू असून, त्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही गुंतवणूक सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्था
विकासकामांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून ३५ हजार कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. विविध व्यवसायांना याचा लाभ होईल आणि प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी निर्माण होतील. १३ आखाड्यांच्या साधुग्रामसाठी तपोवन व परिसरात सुमारे एक हजार ४६८ एकर, तर त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे ६८८ एकर क्षेत्रात साधुग्राम उभारले जात आहे. पार्किंगच्या नियोजनाचा भाग म्हणून नाशिकमध्ये १६ ठिकाणी तीन लाख ३२ हजार १३४ ईसीएस, तर त्र्यंबकेश्वरमध्ये १४ ठिकाणी दोन लाख ४९ हजार ९४० ईसीएस इतकी क्षमता विकसित केली जात आहे. सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देत सुमारे चार हजार ५०० एसटी बस उपलब्ध ठेवण्याची तयारी आहे. रेल्वेमार्गाने प्रतिदिन सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक करण्याची क्षमता विकसित केली जाईल, तर रस्तेमार्गाने आठ लाख भाविकांची वाहतूक करण्याचे नियोजन आहे.
डिजिटल कुंभ आणि स्वच्छ गोदावरी
सिंहस्थाकडे डिजिटल कुंभ म्हणून पाहिले जात आहे. गर्दीचे नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद यासाठी मोठ्या प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. सीसीटीव्ही, सुमारे ३७८ किलोमीटरचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क आणि तीन अत्याधुनिक इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. मोबाईल अॅपच्या माध्यमातून भाविकांना गर्दीची स्थिती, पार्किंगची उपलब्धता आणि आरोग्यसेवेची माहिती मिळेल. घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे आठ हजार ५०० मनुष्यबळाचे नियोजन असून, ६१ हजार ५०० तात्पुरती स्वच्छतागृहे, ३४ हजार स्नानगृहे आणि १६ हजार ५०० कचरापेट्या उपलब्ध केल्या जातील. भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणी १३६ तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारल्या जातील आणि पर्वणी काळात १९० रुग्णवाहिका राहतील. गोदावरी नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी सांडपाणी प्रक्रिया, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त कुंभ यावर विशेष भर देण्यात आला आहे. हरित कुंभ उपक्रमांतर्गत नाशिकमध्ये सुमारे ५० हजार वृक्षांच्या लागवडीचा आणि वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे. नाशिक, पंचवटी, रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक स्थळांसाठी शिव मार्ग आणि राम मार्ग या विशेष पर्यटन बससेवा सुरू केल्या जाणार आहेत. प्रशासनाने सुविधा उभारल्या तरी नागरिकांनी स्वच्छता आणि शिस्त पाळली नाही, तर अपेक्षित परिणाम साध्य होणार नाही, हेही या निमित्ताने अधोरेखित करण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply