पुणे येथे १६ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या सभेच्या इतिवृत्तात असंख्य चुका आढळून आल्याचे मंगळवारी झालेल्या बैठकीत सदस्यांना मिळालेल्या इतिवृत्तातून समोर आले आहे. त्यावरून कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या गटाने तीव्र आक्षेप नोंदवत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. चुकीच्या घटनांची नोंद करण्यात आल्याचा सदस्यांचा दावा आहे.
सभागृहाचे नाव आणि ठरावांबाबत त्रुटी
कार्यकारी मंडळाची सभा माधवराव पटवर्धन सभागृहात झाली असताना इतिवृत्तात मात्र कोहिनूर सभागृहाचा उल्लेख करण्यात आला आहे, असे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच विषयपत्रिकेतील दिवंगतांना श्रद्धांजली आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन या दोन्ही विषयांवर एकमताने ठराव मंजूर झाला असताना आणि स्वतंत्र ठराव करणे बंधनकारक असताना त्याचा उल्लेख इतिवृत्तात नसल्याचेही सदस्यांनी सांगितले. २५ जुलैच्या मागील सभेच्या इतिवृत्तातील त्रुटींबाबतही सदस्यांनी आक्षेप घेतला असून, दुरुस्त्या स्पष्टपणे नोंदविल्याशिवाय इतिवृत्ताला मंजुरी दिल्याचे मोघमपणे नमूद करण्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, ९९ नांदी संमेलनांसाठी बॅनर, स्मृतिचिन्हे आणि बुकमार्क साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार होते. त्यासाठी आगाऊ रक्कम दिली जाईल असा ठराव दाखविण्यात आला आहे. मात्र त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली का आणि कार्यकारी मंडळाची मंजुरी घेण्यात आली का, याची चौकशी करण्याची मागणी कार्यकारी मंडळाच्या सदस्यांच्या गटाने केली आहे.
कायदेशीर सल्ल्यानुसार पुढचे पाऊल
मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव मांडण्यात आल्याने आता पदाधिकाऱ्यांची पुढची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत कायदेशीर सल्ल्यानुसार पुढले पाऊल उचलले जाईल, अशी प्रतिक्रिया प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांनी दिली आहे. सभेपूर्वी सभासदांना इतिवृत्त देण्यात आले असताना त्यावेळी चुका का निदर्शनास आणून दिल्या जात नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इतिवृत्त लेखनात चुका असतील हे मान्य असले, तरी सभेत बोलण्याची संधी असताना त्यावेळी मत न मांडता निघून जाणे कितपत योग्य आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधी इतिवृत्तातील चुका दुरुस्त करून इतिवृत्त मंजूर करण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply