सिंहस्थाचे ध्वजारोहण अवघ्या एका दिवसावर आले असून, त्याअनुषंगाने गोदाघाटावर कडेकोट बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. ध्वजारोहणासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांकडून गोदाघाटावरील नियोजनाची सातत्याने पाहणी केली जात आहे.
राज्याचे कायदा व सुरक्षा विभागाचे अपर पोलिस महासंचालक प्रवीण पडवळ हे नाशिकमध्ये दाखल झाले असून, त्यांनी स्वतः गोदाघाटावरील बॅरिकेटिंग व बंदोबस्ताचा आढावा घेतला. या वेळी परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत गवळी, उपायुक्त किशोर काळे यांच्यासह सहायक आयुक्त आणि पोलिस निरीक्षक उपस्थित होते.
शनिवारी ध्वजारोहण, सायंकाळी गोदाआरती
सिंहस्थ ध्वजारोहण येत्या शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होत आहे. सायंकाळी गोदाआरतीही होणार आहे. या वेळी हजारो भाविक गोदाघाटावर दाखल होणार आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह मंत्री, खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गोदाघाटावर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे.
पाच हजार पोलिसांचा फौजफाटा
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळ्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांशिवाय राज्यभरातून सुमारे पाच हजार पोलिसांचा फौजफाटा नाशिकमध्ये दाखल होणार आहे. शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे १९० अधिकारी-अंमलदार आणि सुमारे ५६९ वाहतूक अंमलदार वाहतूक नियमनासाठी रस्त्यावर असतील. त्र्यंबकेश्वर परिसरातही २०० वाहतूक अधिकारी-अंमलदार तैनात असणार आहेत. शुक्रवारपासून, ३० ऑक्टोबरपासून पंचवटी व जुने नाशिक परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. त्यामुळे या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त होणार आहे. शहराची मुख्य बाजारपेठही शनिवारी बंद राहण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply