दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून छत्रपती संभाजीनगरमधील प्रमुख बाजारपेठा कपडे, सजावटीचे साहित्य व विविध गृहोपयोगी वस्तूंनी सजल्या आहेत. औरंगपुरा आणि शहागंज परिसरातील बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने गजबजून गेल्या असून बाजारात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. यंदाच्या दिवाळीसाठी बाजारात पेशवाई, रजवाडी आणि ज्यूटचे आकर्षक आकाशकंदील दाखल झाले आहेत. विविध प्रकारच्या लायटिंग्सनाही मोठी मागणी आहे.
आकाशकंदिलांमध्ये नवी व्हरायटी
दिवाळीच्या निमित्ताने घराची सजावट व विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिसत आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पणती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत, तर इलेक्ट्रिक दुकानांमध्ये विविध आकर्षक लायटिंग्स आणि नवीन दिव्यांची रेलचेल आहे. यंदाच्या दिवाळीत आकाशकंदिलांमध्ये नवी व्हरायटी बाजारात आली आहे. यात प्रामुख्याने पेशवाई कंदील, रजवाडी कंदील आणि ज्यूटचे कंदील यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. या आकाशकंदिलांचा आकार फार मोठा नसला तरी ते अत्यंत आकर्षक आहेत. याशिवाय मेणबत्त्यांचे विविध प्रकार, दरवाज्यांसाठी नवीन डिझाइनचे तोरण आणि गॅलरीत लावण्यासाठी लहान आकाराचे आकर्षक आकाशकंदीलही बाजारात उपलब्ध आहेत.
किमतीत १० टक्के वाढ, तरी उत्साह कायम
कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने आणि वाहतुकीचा खर्च अधिक झाल्यामुळे यंदा आकाशकंदिलांचे दर मागील वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी ग्राहकांच्या उत्साहात काहीही घट झालेली नाही. विशेष म्हणजे काही स्थानिक बचत गटांच्या माध्यमातूनही आकाशकंदील तयार करून विक्रीसाठी आणले गेल्यामुळे अनेक महिलांना यातून चांगला रोजगार मिळत आहे. व्यावसायिक मिहीर पटेल यांनी सांगितले की, बाजारात नवनवीन प्रकारचे आकाशकंदील आले असून पेशवाई आणि रजवाडी कंदिलांना ग्राहकांची खूप चांगली मागणी आहे; मागील वर्षीच्या तुलनेत किमती किंचित वाढल्या असल्या तरी दर्जेदार माल विक्रीवर आपला नेहमीच भर असतो आणि ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी येत असल्याने बाजारात अतिशय सकारात्मक चित्र आहे. गृहिणी राधिका परोपकारी यांनी सांगितले की, दिवाळी आली की घरात वेगळाच आनंद आणि उत्साह असतो; बाजारात नवीन काय आले आहे हे पाहण्यासाठी त्या खरेदीला आल्या होत्या आणि पणती, लायटिंग्ससह आकाशकंदिलांचे वेगवेगळे प्रकार त्यांना खूप आवडले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply