राज्य परिवहन महामंडळाच्या सवलतधारक प्रवाशांना प्रवासभाड्यातील सवलती सहज मिळाव्यात, यासाठी राष्ट्रीय सामान्य वाहतूक कार्डाच्या नोंदणीला वेग देण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. विशेषतः महिला प्रवाशांनी नोव्हेंबर २०२६ संपण्यापूर्वी या कार्डासाठी नोंदणी करून घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
शासनाच्या निर्णयानुसार महामंडळातील सर्व सवलतधारक प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड दिले जात आहे. त्यासाठी आगार, बसस्थानके आणि प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणी अधिकृत संस्थांच्या माध्यमातून नोंदणी व वाटपाची सोय करण्यात आली आहे.
नोंदणी कुठे आणि केव्हा
अधिकृत केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत नोंदणीची प्रक्रिया सुरू असते. महिला प्रवाशांना सवलत मिळवताना अडचण येऊ नये, यासाठी नोव्हेंबरअखेर नोंदणी पूर्ण करण्यावर विशेष भर दिला जात आहे.
ग्रामीण भागासाठी विशेष शिबिरे
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांपर्यंत ही सुविधा पोहोचावी, यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यालयांच्या माध्यमातून विशेष नोंदणी व वाटप शिबिरे घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरांच्या आयोजनासाठी संबंधित कार्यालयांनी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाशी किंवा आगार प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गृहिणी तसेच नोकरदार महिलांसह सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ पात्र प्रवाशांना कोणत्याही अडथळ्याविना मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply