धारावीतील ट्रान्झिट कॅम्पमधील धोबी घाटाजवळून सायन येथील जैन सोसायटीकडे जाणारा पादचारी पूल बंद करण्याचा महापालिकेचा प्रयत्न बुधवारी स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी हाणून पाडला. सायन कोळीवाडा मतदारसंघाचे आमदार कॅप्टन तामील सेल्वम यांनी पूल बंद करण्यास तीव्र विरोध केल्याने पालिकेच्या ग-उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले. पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्याशिवाय सध्याचा पूल बंद करू नये, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
विद्यार्थी आणि रुग्णांसाठी महत्त्वाचा मार्ग
या पुलावरून धारावी, सायन, सायन कोळीवाडा आणि किंग्ज सर्कल परिसरात जाण्यासाठी दररोज शेकडो नागरिक ये-जा करतात. सायन रुग्णालयासह लायन्स क्लब रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांसाठीही हा जवळचा मार्ग आहे. डी. एस. हायस्कूल, गौरीदत्त मित्तल शाळा, एसआयईएस महाविद्यालय आणि पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी या पुलाचा नियमित वापर करतात. त्यामुळे पूल बंद झाल्यास विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची भीती व्यक्त होत आहे.
यापूर्वीही बंद करण्याचा प्रयत्न फसला
यापूर्वी १६ सप्टेंबर रोजीही पालिकेने पूल बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळीही स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नव्हता. बुधवारी पुन्हा पालिकेचे अधिकारी पूल बंद करण्यासाठी आले असता, नागरिकांनी एकत्र येत विरोध दर्शवला. या वेळी मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. धारावी तालुका अध्यक्ष एन. आर. पॉल यांनीही पूल बंद करण्यास विरोध दर्शवला असून, पालिकेने गुपचूप पूल बंद करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू, असा इशारा त्यांनी दिला. स्थानिक आमदार ज्योती गायकवाड यांनीही पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्याशिवाय पूल बंद करू नये, अशी भूमिका घेतली आहे. जैन सोसायटीकडे जाणारा हा पूल परिसरातील नागरिकांसह शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोयीचा मार्ग असून, त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचतो, असे आमदार कॅप्टन तामील सेल्वम यांनी सांगितले. पर्यायी मार्गाची व्यवस्था होईपर्यंत पूल बंद करू नये, अशी सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply