जळगाव : लेवा पाटीदार समाजातर्फे एकतानगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी समाजाचा मानबिंदू असलेल्या सरदार पटेल यांना त्यांच्या येणाऱ्या १५१ व्या जयंतीनिमित्त सामूहिक सलामी आणि मानवंदना अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघातर्फे हा कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला होता आणि तो उत्साहात पार पडला.
पहिल्यांदाच आयोजित ऐतिहासिक कार्यक्रम
या उपक्रमासोबतच लेवा पाटीदार समाजाची कुलदेवी असलेल्या पावागढ वासिनी कालिका मातेचे सामूहिक दर्शनही घेण्यात आले. नाशिक येथील नोबेल टुरिझमचे या उपक्रमासाठी सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सुरुवात महासंघाच्या प्रथेनुसार नजिकच्या काळात दिवंगत झालेल्या ज्ञात-अज्ञात समाज बांधवांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरदार पटेल आणि आई बहिणाई यांचे प्रतिमापूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
या वेळी महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, नोबेल टुरिझमचे संचालक सचिन भोळे, सचिव दिलीप नाफडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. प्रमोद महाजन, पुरुषोत्तम पिंपळे, खानदेश विभाग समुपदेशन समिती प्रमुख पांडुरंग काळे, खानदेश सेना अध्यक्ष सुहास बोंडे, भरूच येथील महासंघाचे गुजरात विभाग उपाध्यक्ष प्रवीण झांबरे, अहमदाबाद मंडळाचे अध्यक्ष बी. के. पाटील आणि महासंघाचे उपाध्यक्ष विकास वारके आदी उपस्थित होते. दिलीप नाफडे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रणिता झोपे व डॉ. मिलिंद पाटील यांनीही प्रास्ताविकात सहभाग घेतला. साधना लोखंडे यांच्या वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘सरदार गीत’चे सादरीकरण
नंदुरबार येथील सरदार गाथा सादर करणारे हेमंत पाटील यांनी तयार केलेली प्रार्थना या वेळी सादर करण्यात आली. त्यावेळी सरदार पटेल यांची आरतीही करण्यात आली. शेवटी कवी आणि महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी त्यांचे स्वरचित ‘सरदार गीत’ नीता वराडे, साधना लोखंडे, प्रीती इंगळे, पुष्पा पाटील, प्रणिता झोपे आणि डॉ. प्रा. किरण चौधरी यांच्या सहयोगाने सादर केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply