तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील तिरुपरनकुंद्रम टेकडीवर शनिवारी संध्याकाळी कार्तिगई दीपमचा दीप प्रज्वलित करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम पार पडला. न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीच्या देखरेखीखाली दीप लावण्यात आला. समितीने आधीच जाहीर केलं होतं की २८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता टेकडीच्या माथ्यावर असलेल्या दगडी स्तंभावर दीप प्रज्वलित केला जाईल. त्यानुसार विशेष तयारी करण्यात आली होती.
सुरक्षा व्यवस्था आणि न्यायाधीशांची पाहणी
सुरक्षेचा भाग म्हणून मंदिर आणि टेकडी परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल तैनात करण्यात आलं होतं. कार्यक्रमापूर्वी न्यायालयाने नियुक्त केलेले निवृत्त न्यायाधीश एस. वैद्यनाथन आणि व्ही. पार्थिबन यांनी तिरुपरनकुंद्रम सुब्रमण्य स्वामी मंदिरात जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यानंतर दोन्ही न्यायाधीश दीप प्रज्वलनासाठी लागणारं साहित्य घेऊन टेकडीच्या मार्गाने वर गेले. दरम्यान, टेकडीवर असलेल्या सिकंदर दर्ग्यातही दुआ आणि प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर परिसरात विशेष दक्षता बाळगण्यात आली होती. स्थानिकांनी संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दीप प्रज्वलित झाल्यानंतर कोणतीही अनुचित घटना न घडता कार्यक्रम संपन्न झाला. प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून आहेत.
टेकडीचं धार्मिक महत्त्व आणि वादाची पार्श्वभूमी
तिरुपरनकुंद्रम टेकडीला हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही समुदायांसाठी धार्मिक महत्त्व आहे. टेकडीवर एका बाजूला प्रसिद्ध तिरुपरनकुंद्रम सुब्रमण्य स्वामी मंदिर आहे. हे मंदिर भगवान मुरुगन यांच्या सहा प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक मानलं जातं. याच टेकडीवर सिकंदर दर्गाही आहे, जिथे मुस्लीम भाविक जातात. गेल्या वर्षी मद्रास उच्च न्यायालयाने याच प्रकरणात आदेश दिला होता. मात्र, तामिळनाडू सरकारने त्याची अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायाधीशांची रिसीव्हर म्हणून नियुक्ती करत मंदिराचं विश्वस्त मंडळ निलंबित केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने कार्तिगई दीपमच्या दिवशी, २४ नोव्हेंबरला टेकडीवरील दगडी स्तंभावर एकदा दीप प्रज्वलित करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर २८ नोव्हेंबरला हा दीप पुन्हा प्रज्वलित करण्यात आला.
प्रतिक्रिया व्यक्त करा