पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी वारकरी भाविकांनी भरभरून दान अर्पण केले. या यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला विविध देणग्या, हुंडीपेटी, लाडू प्रसाद विक्री, भक्तनिवास तसेच सोने-चांदीच्या अर्पणातून एकूण ६ कोटी ३९ लाख ३५ हजार २२ रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
कार्तिकी शुद्ध प्रतिपदा, १० नोव्हेंबर ते कार्तिकी शुद्ध पौर्णिमा, २४ नोव्हेंबर या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ५१ लाख ५५ हजार १५४ रुपये अर्पण केले. देणगी स्वरूपात १ कोटी ४३ लाख ६१ हजार ६५७ रुपये, लाडू प्रसाद विक्रीतून ४८ लाख ५८ हजार ५०० रुपये, भक्तनिवासातून ५९ लाख ८५ हजार २४४ रुपये, हुंडीपेटीतून १ कोटी ४१ लाख ४० हजार ७८० रुपये, पूजेतून ३ लाख ३० हजार ४७५ रुपये, तर सोने-चांदीच्या अर्पणातून १ कोटी ८४ लाख २२ हजार ४१५ रुपये प्राप्त झाले. तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो आणि मोबाईल लॉकर आदी माध्यमांतून ६ लाख ८० हजार ७९७ रुपये उत्पन्न मिळाले.
मागील वर्षाच्या तुलनेत वाढ
मागील वर्षीच्या कार्तिकी यात्रेत याच माध्यमांतून एकूण ५ कोटी १८ लाख ७७ हजार २२८ रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. यंदा हे उत्पन्न ६ कोटी ३९ लाख ३५ हजार २२ रुपये झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत १ कोटी २० लाख ५७ हजार ७९४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
नित्य राजोपचार पूर्ववत सुरू
शनिवारी श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा विधिवत संपन्न झाली. देवाचा शिणवटा आणि थकवा दूर होण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचा नैवेद्य रात्री शेजारतीच्या वेळी श्रींना अर्पण करण्यात आला. प्रक्षाळपूजेनंतर श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेचे पहाटे होणारे काकड आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोशाख, धुपारती आणि शेजारती यांसह सर्व नियमित राजोपचार परंपरेनुसार पूर्ववत सुरू करण्यात आले.
प्रतिक्रिया व्यक्त करा