तिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामींना गुरुवारी (२६ नोव्हेंबर) १२१ किलो सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने अर्पण करण्यात आले. या दागिन्यांची किंमत सुमारे २०७.६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. चेन्नई येथील व्यावसायिक वर्धमान जैन आणि राधिका जैन यांनी हे दागिने अर्पण केले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत तिरुमला मंदिरात हे दागिने अर्पण करण्यात आले.
४६ प्रकारचे दागिने; मूर्ती डोक्यापासून पायापर्यंत सजणार
तिरुमला तिरुपती देवस्थानमचे जनसंपर्क अधिकारी रवी यांनी सांगितले की, भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूळ मूर्तीला डोक्यापासून पायापर्यंत सजवण्यासाठी सोन्याचे आणि हिऱ्यांचे ४६ प्रकारचे दागिने भेट म्हणून देण्यात आले आहेत. यापैकी १०६ किलो सोन्यापासून तिरुमला येथील देवीसाठी दागिने तयार करण्यात आले आहेत. तर उर्वरित १५ किलो सोन्यापासून तिरुचनूर येथील श्री पद्मावती देवीसाठी सुवर्णवस्त्रे तयार केली जाणार आहेत.
टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी रवी, माजी कार्यकारी अधिकारी एल. व्ही. सुब्रमण्यम आणि माजी मुख्य पुजारी डॉ. ए. व्ही. रमण दीक्षितुलू यांनी सांगितले की, १९३३ मध्ये ब्रिटिश राजवटीत तिरुमला तिरुपती देवस्थानमची स्थापना झाली. त्यानंतरच्या गेल्या नऊ दशकांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोने दान स्वरूपात मिळाले आहे. रमण दीक्षितुलू यांनी म्हटले की, श्रीकृष्णदेवराय यांच्या काळानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने दान करण्यात आले आहेत. आधुनिक इतिहासात एकाच वेळी सर्वाधिक सोन्याचे दागिने दान करणारी व्यक्ती म्हणून वर्धमान जैन यांची नोंद होईल, असेही त्यांनी सांगितले.
वर्धमान जैन कोण आहेत?
वर्धमान जैन हे चेन्नई येथील एशिया इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक आहेत. ते आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांना बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग सेवा देणाऱ्या ॲक्सेस हेल्थकेअर या कंपनीचे संस्थापक आणि संचालक मंडळाचे उपाध्यक्षही आहेत.
टीटीडीचे जनसंपर्क अधिकारी रवी यांनी सांगितले की, वर्धमान जैन हे तिरुमला श्रीवारीचे मोठे भक्त आहेत. साधारण १५ महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील कंपनीचे शेअर्स विकून काही हजार कोटी रुपये कमावले होते. त्याच वेळी त्यांनी देवाला मोठी भेट अर्पण करण्याचा संकल्प केला होता. याच संकल्पानुसार त्यांनी देवासाठी १०६ किलो सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, तर देवीसाठी १५ किलो सोन्याचे दागिने तयार करण्याचे नियोजन केले. हे दागिने चेन्नईतील एका नामांकित कंपनीने तयार केले आहेत. हे ४६ दागिने लाकडाच्या ४६ पेट्यांमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा