बारा दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा कर्नाटकातील आशा सेविकांनी शनिवारी केली. दरमहा दोन हजार रुपयांची अतिरिक्त वाढ देण्याची घोषणा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
बेंगळुरूच्या फ्रीडम पार्कमध्ये या सेविका गेल्या बारा दिवसांपासून थंडी आणि पावसाचा सामना करत बसल्या होत्या. विधानसौधापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेले हे ठिकाण त्यांच्या आंदोलनाचे केंद्र बनले होते.
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, मग घोषणा
शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या ‘कृष्णा’ या अधिकृत निवासस्थानी आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मानधनवाढीची घोषणा केली.
आतापर्यंत आशा सेविकांना राज्य सरकारकडून पाच हजार आणि केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये, असे एकूण सात हजार रुपये मिळत होते. नव्या वाढीमुळे जानेवारी २०२७ पासून त्यांच्या हाती नऊ हजार रुपये पडतील.
काही सेविका मात्र समाधानी नाहीत
संघटनेने आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले असले, तरी काही सेविका या निर्णयावर समाधानी नाहीत. मानधन पंधरा हजार रुपये करावे, या मागणीवर त्या ठाम आहेत. आंदोलनाबाबतचा अंतिम निर्णय अजून व्हायचा असल्याचे काही सेविकांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा