सावंतवाडी तालुक्यातील चारठे येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२६-२७ चे उद्घाटन शुक्रवारी झाले. सावंतवाडी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आयोजित या दोन दिवसीय प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांचे पर्यावरण आणि शेतीवरील प्रकल्प
उद्घाटनप्रसंगी बोलताना कामत म्हणाले की, आजचा विद्यार्थी हा उद्याचा शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि अभियंता आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील कुतूहल आणि जिज्ञासेला वाव देणारे विज्ञान प्रदर्शन हे भावी शास्त्रज्ञ घडवण्याचे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरण, पाणी बचत, सौर ऊर्जा, स्मार्ट शेती आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर सुंदर प्रतिकृती साकारल्या आहेत. विज्ञान हे केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रयोगातून शिकायचे असते. आजचा छोटासा प्रयोग उद्या मोठा शोध ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत, प्रयोग करावेत आणि सातत्याने शिकत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण, विज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद नेहमीच सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
शनिवारी समारोप समारोह
जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. यावेळी पंचायत समिती सभापती सुश्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शशिधर गावडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रशांत सावंत, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. शनिवारी पारितोषिक वितरण आणि समारोप समारंभाने प्रदर्शनाची सांगता होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा