भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळ्या आणि आशयपूर्ण कथा सादर करण्याच्या उद्देशाने ‘अथांग स्टुडिओज’ या नव्या चित्रपट निर्मिती संस्थेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निमित्ताने स्टुडिओच्या ‘तांडेल’ या पहिल्या मराठी चित्रपटाचा टायटल टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे आणि आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेते ओम भुतकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. आज प्रदर्शित झालेल्या टीझरमधून चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली असून, 2027 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.
समुद्राशी असलेले नाते उलगडणारी कथा
‘तांडेल’ चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संदिप पांडुरंग माने यांचे आहे, तर पटकथा आणि संवाद किरण यज्ञोपवित यांनी लिहिले आहेत. ही एका पारंपरिक मच्छिमाराची गोष्ट असून यामध्ये माणसाचे समुद्राशी असलेले अतूट नाते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टीझरमधून चित्रपटाच्या विषयाची प्रभावी ओळख करून देण्यात आली आहे.
याबद्दल बोलताना दिग्दर्शक संदिप पांडुरंग माने यांनी सांगितले की, ‘तांडेल’ ही त्यांची पहिली कलाकृती म्हणजे केवळ पारंपरिक मासेमारीची कथा नाही, तर आधुनिकीकरणाच्या वेगात अस्तित्व जपू पाहणाऱ्या माणसांच्या जगण्याची ही गोष्ट आहे. गेली बारा वर्षे जपलेले सिनेमाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या प्रवासातला ‘तांडेल’ हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी म्हटले. सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांसारखे ताकदीचे कलाकार या कथेला एक वेगळीच उंची देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निर्मितीची धुरा आणि कलाकारांची उत्सुकता
अथांग स्टुडिओजच्या माध्यमातून निर्मात्या अमृता संदिप माने यांनी एका आशयघन आणि भव्य विषयाची निवड करत मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार कलाकृती आणण्याचा निर्धार केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती प्रक्रिया आणि नियोजनाची धुरा कार्यकारी निर्माता दत्तसंग्राम वासमकर यांनी समर्थपणे सांभाळली आहे. तर समुद्राची अथांगता आणि त्यातील संघर्षाचा थरार छायाचित्रकार अभिमन्यु डांगे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून प्रभावीपणे टिपला आहे.
दोन्ही प्रमुख कलाकारांचे चित्रपटातील लुक तसेच चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ‘तांडेल’ या चित्रपटाबद्दल सिनेरसिकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 2027 मध्ये चित्रपटगृहांत दाखल होणाऱ्या या चित्रपटाकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा