स्वराज्याच्या शत्रूंच्या गोटात शिरून त्यांची रणनीती जाणून घेणारा, शत्रूला चकवा देत महाराजांच्या मोहिमांना यश मिळवून देणारा बहिर्जी नाईक… या असामान्य गुप्तहेराच्या शौर्याची, बुद्धिचातुर्याची आणि स्वराज्याप्रती असलेल्या निष्ठेची कहाणी आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. अंश मिडिया वर्क्स निर्मित आगामी भव्य चित्रपट ‘बहिर्जी’चे मोशन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.
मोशन पोस्टरमधील रहस्यमयी झलक
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या मोशन पोस्टरने चित्रपटाच्या रहस्यमयी विश्वाची झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. त्यातून एकेक करत समोर येणारे चेहरे, त्यांच्या नजरेतील तीक्ष्णता आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा भारदस्त लुक चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. मोशन पोस्टरमध्ये दिसणारे प्रत्येक पात्र काहीतरी सांगू पाहात आहे. कोणाच्या नजरेत युद्धाचा आवेश, तर कोणाच्या चेहऱ्यावर गुप्त मोहिमेची गंभीरता दिसते. वेगवेगळ्या रूपांत समोर येणारे हे चेहरे स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांची आणि त्या काळातील गुप्त मोहिमांची झलक देतात.
कोणत्या व्यक्तिरेखा असणार?
या व्यक्तिरेखा नेमक्या कोणत्या असणार, त्यांच्यातील नातेसंबंध काय असणार आणि स्वराज्याच्या या गुप्त विश्वात कोणाची भूमिका निर्णायक ठरणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे लेखन युवराज पाटील यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीच्या प्रवासात बहिर्जी नाईक यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यांच्या गुप्त मोहिमांचा थरार आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा