हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर पुन्हा एकदा मार्व्हलच्या चित्रपटविश्वात परतत आहे. मात्र यावेळी तो सुपरहिरो म्हणून नव्हे, तर डॉक्टर डूम या धोकादायक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अॅव्हेंजर्स: डूम्सडे’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही मजेशीर गोष्टी आता समोर आल्या आहेत.
सेटवर जेवण आणि खेळांची व्यवस्था
चित्रपटात पडद्यावर मोठी लढाई पाहायला मिळणार असली, तरी सेटवर मात्र जेवण, खेळ आणि मस्तीचे वातावरण होते. अभिनेता पॉल रुड याने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला. अँट-मॅनची भूमिका साकारणाऱ्या पॉलने सांगितले की, रॉबर्ट डाउनी ज्युनियरने सेटवर सर्वांसाठी खास जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे कलाकार आणि टीममधील सदस्य एकत्र वेळ घालवू शकत होते. सेटवरील वातावरण अगदी कुटुंबासारखे होते आणि सर्वजण या क्षणांचा आनंद घेत होते, असेही त्याने सांगितले.
डाउनीची मिश्कील प्रतिक्रिया
यावर मिश्कील प्रतिक्रिया देताना रॉबर्ट डाउनी ज्युनियर म्हणाला, ‘मी माझ्या केटरिंग सेवेचा विस्तार केला आहे.’ अभिनेत्री लेटिशिया राइट यांनीही डाउनीच्या या आदरातिथ्याची पुष्टी केली. एवढेच नाही, तर सेटवर पॅक-मॅनसारख्या व्हिडिओ गेम्सचीही व्यवस्था असल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे, मार्व्हलच्या याआधीच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानही डाउनी कलाकारांसाठी अशा प्रकारे जेवणाचे आयोजन करत असे. पडद्यावर डॉक्टर डूम अॅव्हेंजर्स, एक्स-मेन, थंडरबोल्ट्स आणि फॅन्टास्टिक फोर यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करणार असला, तरी पडद्यामागे डाउनी आपल्या सहकलाकारांसाठी जेवण, खेळ आणि धमाल यांची खास व्यवस्था करत होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा