मतदारसंघ पुनर्रचना विधेयक अर्थात डिलिमिटेशन बिलाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाठिंबा मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादी एनडीएसोबत सत्तेत सहभागी होणार का, याबाबतच्या तर्क-वितर्कांनाही उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुमच्यासोबत आघाडीत असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष संसदेत सादर होणाऱ्या डिलिमिटेशन बिलाला समर्थन देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांनी खरंच बिलाला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचे स्थान कसे असेल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
या प्रश्नावर बोलताना शरद पवारांच्या पक्षाचे इंडिया आघाडीतील स्थान आज जे आहे तेच राहील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने डिलिमिटेशनचे समर्थन केले तरी त्यांचे आघाडीतील स्थान बदलणार नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले. एकीकडे विजय वडेट्टीवार यांच्यासारखे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सकाळपासून शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर हल्लाबोल करत असताना राहुल गांधी यांनी मात्र पवारांबाबत सबुरीची भूमिका घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना अजूनही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष डिलिमिटेशनबाबतच्या आपल्या भूमिकेत बदल करण्याची आशा आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहुल गांधींचे मित्रपक्षांना आवाहन
राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांसह भाजपसोबत असलेल्या इतरही राजकीय पक्षांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. लोकशाही वाचवण्याच्या बाजूने कोण आहे आणि विरोधात कोण आहे, हे स्पष्ट होणार आहे. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसह इतरही राजकीय पक्षांकडून, चंद्रबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी भारताचा विचार करावा, लोकशाहीचा विचार करावा. या गुन्हेगारांच्या विरोधात सर्वांनी लढावे, असे ते म्हणाले. तसेच ८५० हा भारताच्या लोकशाहीला नष्ट करण्याचा नंबर आहे. आज लोकसभेत ५४३ जागा आहेत. पण आम्हाला ५४३ नकोय तर ८५० जागा हव्यात, असे भाजपचे म्हणणे आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला आहे.
शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाबद्दल सबुरीची भूमिका दाखवल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सकाळपासून हेच सांगत आहे की, सोमवारी संसदेत हे विधेयक मांडले जाईल. त्यानंतर सदर विधेयक वाचून आमच्या पक्षाची भूमिका ठरवली जाईल. मात्र त्याआधीच आमचे मित्रपक्ष शरद पवार यांच्यावर बोलले. परंतु आता राहुल गांधी यांनी समजूतदारपणा दाखवला आहे. ज्या पद्धतीने सकाळी विजय वडेट्टीवार आणि इतर नेत्यांनी शरद पवारांवर टीका केली ते आम्ही सहन करू शकत नाही, असे शिंदे म्हणाले.
दरम्यान, संसदेत डिलिमिटेशन बिल मांडू द्या. हे बिल मांडल्यानंतर त्यावरील चर्चा संपूर्ण देशाला कळेल. याबाबत भूमिका घेतल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण होईल. वीस वर्षांनंतर डिलिमिटेशन होतं का तर होतं. आमच्या कालावधीतही झाले होते, असेही शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा