नाशिक, दि. २८ नोव्हेंबर २०२६: शेतकरी, मत्स्यपालक आणि मत्स्यव्यावसायिकांना मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासकीय योजनांची माहिती मिळावी, तसेच मत्स्यपालनाला पूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने नाशिक येथील मांडसांगवी परिसरात आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय ‘कृषीथॉन २०२६’ कृषी प्रदर्शनात मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने माहितीपर स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, अनुदान, आर्थिक सहाय्य, नोंदणी प्रक्रिया आणि आधुनिक मत्स्यसंवर्धन तंत्रज्ञानाबाबत अभ्यागतांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती व अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
स्टॉलमध्ये मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना (CMMSY) अंतर्गत उपलब्ध विविध योजनांची माहिती देण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. तसेच महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष आणि अर्जासंदर्भातील शंकांचे निरसन करण्यात येत आहे.
मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा; विविध सुविधांची माहिती
मत्स्यव्यवसायाला कृषी क्षेत्राच्या समकक्ष दर्जा देण्यात आल्यामुळे मत्स्यव्यावसायिकांना उपलब्ध होणाऱ्या विविध शासकीय सुविधांची माहितीही या स्टॉलवर देण्यात येत आहे. किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजनेंतर्गत उपलब्ध कर्ज सुविधा, व्याजदरातील सवलती तसेच मत्स्यव्यावसायिकांसाठी वीजदरात उपलब्ध असलेल्या सवलतींबाबत अभ्यागतांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मत्स्यपालनातील नियम, नोंदणी व रोजगाराच्या संधींबाबत जनजागृती
पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने विदेशी मागूर (African Catfish) पालनावरील बंदी व त्यासंदर्भातील नियमांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. याशिवाय राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्म (NFDP), ई-श्रम नोंदणी आणि GAIS यांसारख्या नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व, त्यापासून मिळणारे संभाव्य लाभ आणि नोंदणीची पद्धत याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.
शेततळ्यातील मत्स्यसंवर्धनातून उत्पन्नवाढीचा संदेश
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेततळ्यामध्ये मत्स्यसंवर्धन करण्याच्या संधी, उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, मत्स्यपालनासाठी आवश्यक तांत्रिक बाबी आणि त्यातून शेतकऱ्यांना मिळू शकणारे अतिरिक्त उत्पन्न याबाबतही माहिती देण्यात येत आहे. यामुळे पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत आहे.
या माहितीपर स्टॉलमध्ये आकर्षक पद्धतीने मांडण्यात आलेले सुंदर ॲक्वेरियम हे अभ्यागतांचे विशेष आकर्षण ठरत आहे. शोभिवंत मत्स्यपालन, मत्स्यसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील विविध व्यावसायिक संधींबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण होत आहे.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असून, मत्स्यपालनाच्या माध्यमातून स्वयंरोजगार, रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्या संधींबाबत जनजागृती होत आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकरी, मत्स्यपालक आणि नागरिकांकडून या स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनात मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी दिनेश धोपे, किशन वाघमारे, श्रीरंग पठारे, अमित स्वामी आदी उपस्थित राहून अभ्यागतांना विविध योजनांची व तांत्रिक बाबींची माहिती देत आहेत.
फोटो गॅलरी

प्रतिक्रिया व्यक्त करा