नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मतदारसंघ पुनर्रचना आणि मतचोरीच्या आरोपांवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकसभेतील सदस्यसंख्या ५४३ वरून ८५० करण्याचा सरकारचा प्रस्ताव असून, त्यासाठी महिला आरक्षणाचे कारण दिले जात असल्याचे त्यांनी म्हटले. एप्रिलमध्ये सरकारने संसदेत असा प्रस्ताव मांडला होता; मात्र तो मंजूर होऊ शकला नव्हता.
‘ब्लँक चेक’ मिळेल, असा आरोप
जागांची संख्या वाढवल्यानंतर सरकारला देशाच्या राजकीय नकाशात मोठे बदल करण्याची संधी मिळेल, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. कोऱ्या कागदावर मनाप्रमाणे चित्र काढता येते, तशीच ही प्रक्रिया असेल, असे ते म्हणाले. लोकसभेच्या जागा ८५० केल्यानंतर सरकारला ब्लँक चेक मिळेल आणि त्यानंतर सरकारला आपल्या मनाप्रमाणे कोणतेही बदल करता येतील, असा आरोप त्यांनी केला.
या प्रक्रियेत मतदारसंघांच्या सीमा नव्याने ठरवल्या जातील, असे राहुल गांधी म्हणाले. त्यावेळी सरकार आपल्या सोयीनुसार भाग आणि मतदारांची निवड करू शकेल, असा आरोप त्यांनी केला. प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागा समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढवल्या जातील, असे सांगितले जात आहे; पण हा मुद्दा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या ५४३ जागा कायम ठेवल्या तरी मतदारसंघांच्या सीमा बदलून राजकीय बदल करता येऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
पुनर्रचना समितीवरही प्रश्न
मतदारसंघांची पुनर्रचना करणाऱ्या समितीत पंतप्रधानांनी निवडलेले एक निवृत्त न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि ज्ञानेश कुमार यांनी निवडलेला तिसरा सदस्य असेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तरुण पिढीने या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमार तुमचे भविष्य उद्ध्वस्त करतील, असेही ते म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा