अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी युनायटेड फिडेलिटी बँक बंद करण्याचा निर्णय नियामकांनी घेतला आहे. बँक बंद करण्याचा निर्णय झाला तेव्हा तिची संपत्ती सुमारे साडेपाच लाख कोटी रुपये होती. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँक बंद झाल्यामुळे बहुतांश ग्राहकांना त्यांची रक्कम काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कारण फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन या संस्थेने युनायटेड फिडेलिटी बँकेच्या सर्व ठेवी आणि मालमत्ता फर्स्ट सिटीझन बँक अँड ट्रस्ट कंपनीकडे सोपवल्या आहेत.
बँकेची आर्थिक स्थिती का खालावली?
इंडियाना राज्यातील इवांसविले येथील या बँकेकडे ३० सप्टेंबर २०२६ रोजी जवळपास ५.४ अब्ज डॉलरच्या ठेवी होत्या, तर सुमारे ३.१ अब्ज डॉलरची कर्जे होती. नियामकांच्या मते बँकेची आर्थिक स्थिती इतकी खराब झाली होती की ती आपल्या जबाबदाऱ्या आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी सक्षम राहिली नव्हती. त्यामुळेच बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एफडीआयसीने बँक आपल्या ताब्यात घेतल्यानंतर तिच्यातील बहुतांश खात्यांची संपत्ती फर्स्ट सिटीझन बँकेत वर्ग करण्यात आली. यासाठी ग्राहकांना नवे खाते सुरू करण्याची गरज नाही; जुन्या खात्यातील पैसे नव्या खात्यात आपोआप वर्ग होतील. ग्राहक चेकबुक, एटीएम आणि डेबिट कार्डचा वापर पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवू शकतात. पगार आणि सामाजिक सुरक्षा यांसारख्या थेट जमा होणाऱ्या सेवा कोणत्याही अडथळ्यांशिवाय सुरू राहतील. बँकेच्या २२ शाखा फर्स्ट सिटीझन या नावाने सुरू करण्यात येणार आहेत.
ठेवीदारांवर काय परिणाम होणार?
एफडीआयसीच्या माहितीनुसार, युनायटेड फिडेलिटी बँक बंद झाल्याने तिच्या ठेव विमा निधीला सुमारे १.७० लाख कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. फर्स्ट सिटीझन बँकेत खाती वर्ग करण्यात आलेल्या ग्राहकांना नव्याने एफडीआयसी विमा सुरक्षा मिळेल. हे काम आणखी सहा महिने सुरू राहील. ग्राहकांनी नव्या ठेवी करारावर सही केल्यानंतर निश्चित केलेल्या कालावधीनंतर रक्कम काढायची असेल तर त्यावर दंड द्यावा लागणार नाही.
बँक बदलल्याने सध्या सुरू असलेले गृहकर्ज, तारण कर्ज किंवा इतर कर्जांचे नियम बदलणार नाहीत. पहिल्याप्रमाणेच हप्ते जमा करावे लागतील आणि व्याजदर तसेच भरण्याची तारीख जुन्या करारानुसारच राहील. मात्र कर्जाचे व्याज, बचत खात्याचे व्याज आणि भरण्याच्या अटी या ग्राहकांच्या करारावर अवलंबून असतील.
प्रतिक्रिया व्यक्त करा