भारतीय भांडवली बाजारासाठी एक ऐतिहासिक क्षण समोर आला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने बाजार भांडवलाच्या बाबतीत लंडन स्टॉक एक्सचेंजला मागे टाकले असून, आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा शेअर बाजार बनण्याचा मान त्याला मिळाला आहे. भारतीय बाजारपेठेची जागतिक पातळीवरील वाढती ताकद या कामगिरीतून दिसून येत आहे.
जागतिक क्रमवारीत एनएसई कुठे?
लंडन स्टॉक एक्सचेंज समूहाच्या आकडेवारीनुसार, एनएसईचे बाजार भांडवल सुमारे 5.86 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्याच वेळी लंडन स्टॉक एक्सचेंजचे बाजारमूल्य जवळपास 5.77 लाख कोटी रुपये इतके आहे. या फरकामुळेच एनएसईने लंडनच्या एक्सचेंजला मागे टाकले आहे. जर्मनीच्या ड्यूश बोर्स एजीचे बाजार भांडवल सुमारे 5.9 लाख कोटी रुपये म्हणजेच 63.4 अब्ज डॉलर इतके असून, त्यालाही एनएसईने मागे टाकले आहे.
जागतिक बाजार भांडवलाच्या क्रमवारीत एनएसईच्या पुढे आता केवळ दोन एक्सचेंज आहेत. शिकागोस्थित सीएमई समूह सुमारे 10.49 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह पहिल्या क्रमांकावर आहे, तर इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज जवळपास 9.34 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
शेअरमधील तेजीमुळे बाजारमूल्यात भर
एनएसईच्या या जागतिक कामगिरीमागे कंपनीच्या शेअरमध्ये झालेली जोरदार वाढ महत्त्वाची ठरली आहे. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत झालेल्या 18 पैकी 14 व्यवहार सत्रांमध्ये एनएसईच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. या तेजीमुळे शेअरने 2,400 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यातही एनएसईच्या शेअरमध्ये जवळपास 34 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. शेअरच्या सातत्यपूर्ण तेजीमुळेच एनएसईच्या बाजारमूल्यात मोठी भर पडली आहे.
एनएसईने लंडन स्टॉक एक्सचेंजला मागे टाकणे ही भारतीय वित्तीय बाजारपेठेच्या वाढत्या जागतिक प्रभावाची महत्त्वाची खूण मानली जात आहे. गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग, शेअर बाजारातील व्यवहारांची वाढ आणि भारतीय बाजारपेठेचे विस्तारलेले स्वरूप यामुळे एनएसईची जागतिक पातळीवरील स्थिती मजबूत होत आहे. मात्र, एक्सचेंजची जागतिक क्रमवारी ही त्यांच्या बाजारमूल्यातील चढ-उतारांवर अवलंबून असते. त्यामुळे शेअर्सच्या किमतीत होणाऱ्या बदलांनुसार ही क्रमवारी भविष्यात बदलू शकते, हेही लक्षात घ्यावे लागेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा