केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ड्यूश बँक रिसर्चच्या अहवालानुसार, आयोगाच्या शिफारशी लागू करायला 2028 पर्यंत उशीर झाला, तर केंद्र सरकारवर तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा जास्तीचा आर्थिक बोजा पडू शकतो.
थकबाकीमुळं वाढणार बोजा
शिफारशी लागू होण्यास उशीर झाला की, कर्मचारी आणि पेन्शनधारकांचं वेतन व पेन्शनमधील फरकाची थकबाकी वाढत जाते. ही थकबाकी एकत्रितपणे द्यावी लागल्यास सरकारवर किमान 3 लाख कोटी रुपयांचा जास्तीचा भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं अंमलबजावणीला उशीर करून तात्पुरती बचत करण्याचा प्रयत्न भविष्यात महागात पडू शकतो, असा इशारा अहवालात दिला आहे. उशीर झाला तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन आणि थकबाकीसाठी अधिक वाट पाहावी लागू शकते. प्रत्यक्ष थकबाकी किती असेल आणि ती कधी दिली जाईल, याबाबत सरकारची अधिकृत घोषणा महत्त्वाची ठरणार आहे.
अर्थव्यवस्थेचा अंदाज काय?
ड्यूश बँकेच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स, बट रिस्की बिझनेस’ या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2027-28 मध्ये केंद्र सरकारची राजकोषीय तूट जीडीपीच्या 4.3 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सरकारचा एकूण खर्च आणि उत्पन्न यातील तफावत भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावं लागू शकतं. थकबाकीव्यतिरिक्त सरकारसमोर इतर आर्थिक आव्हानंही आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास आयात खर्च वाढू शकतो. अन्नधान्य आणि खतांवरील अनुदानाचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून सरकारला मिळणाऱ्या लाभांशात घट झाली, तर सरकारी उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे, अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक अंदाजही व्यक्त केला आहे. वेतन आयोगामुळं कर्मचाऱ्यांच्या हातात जास्त पैसा आल्यास त्याचा फायदा बाजारपेठेला आणि देशांतर्गत मागणीला होऊ शकतो. अहवालानुसार भारताचा आर्थिक विकासदर 2026-27 मध्ये 7.3 टक्के, 2027-28 मध्ये 7.2 टक्के आणि 2028-29 मध्ये 7.3 टक्के राहू शकतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा